
भंडारा (pragatbharat.com) : तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या भंडारा – गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी (Bhandara – Gondia Vidhan Parishad Election 2026) राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या जागेवरील उमेदवारीवरून सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये अद्यापही तिढा सुटलेला नाही. या जागेवर भारतीय जनता पक्षासह (BJP) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार शड्डू ठोकला आहे. तर दुसरीकडे, संख्याबळ कमी असतानाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जागा काँग्रेसच लढणार आणि जिंकणार, असा मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट संघर्ष भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या एकूण ४५७ मतदारांपैकी २२० पेक्षा अधिक मतदार हे भाजपचे असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते परिणय फुके यांनी स्पष्ट केले आहे की, “ही जागा भाजपच लढणार असून, ज्यांनी पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे मेहनत केली अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाईल. इतर पक्षांतून आलेल्या आयात नेत्यांना उमेदवारी दिली जाणार नाही.”
परंतु, भाजपच्या या दाव्याला आव्हान देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन आणि भंडाऱ्याचे सहकार महर्षी सुनील फुंडे यांनी या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून पक्षाकडे उमेदवारीची अधिकृत मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीमधील हा तिढा कसा सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, यापूर्वी नाना पटोले जेव्हा भाजपमध्ये होते, तेव्हा त्यांनी संख्याबळ नसतानाही परिणय फुकेंना जिंकवून आणण्याचा चमत्कार केला होता. तसाच काहीसा चमत्कार ते आता काँग्रेससाठी करणार का, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
अमरावती विधान परिषदेतही राजकीय भूकंप; राणा दाम्पत्याचा प्रवीण पोटे यांना विरोध? दुसरीकडे, अमरावती विधान परिषद निवडणुकीतही (Amravati Vidhan Parishad Election) नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपमधून सध्या माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे हे इच्छुक आहेत. मात्र, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (राणा दाम्पत्य) यांचा प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. पोटे यांना शह देण्यासाठी रवी राणा हे त्यांचे भाऊ सुनील राणा यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असून, यासाठी त्यांच्या काँग्रेस नेत्यांशीही फोनवरून चर्चा सुरू असल्याचे समजते. तसेच शिवसेनेचे अकोला येथील माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया हे देखील अपक्ष किंवा काँग्रेसकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडून ऐनवेळी पोटे यांना टक्कर देण्यासाठी यशोमती ठाकूर यांच्या नावाची मोठी घोषणा होऊ शकते.
अमरावतीचे संख्याबळ कोणाच्या बाजूने? संख्याबळाचा विचार केला तर अमरावतीची जागा सध्या महायुतीसाठी सेफ झोनमध्ये मानली जात आहे. एकूण ४५३ मतदारांपैकी जवळपास २४८ मते महायुतीकडे आहेत, तर महाविकास आघाडीकडे १५२ मतांचे संख्याबळ आहे. उर्वरित ५३ मतदार हे अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचे असल्याने त्यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

