
मुंबई (pragatbharat.com) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत आयोजित करण्यात आलेली ‘नीट यूजी’ (NEET UG) परीक्षा रद्द झाल्यानंतर ती आता २१ जून २०२६ रोजी नव्याने घेण्यात येणार आहे. या परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी (Engineering) आणि औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, राज्य सामाईक परीक्षा कक्षाने (CET Cell) यावर अधिकृत खुलासा करत, राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच पूर्ण होणार असून विद्यार्थी आणि पालकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये, असे जाहीर केले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नीट परीक्षेचा फटका अभियांत्रिकी प्रवेशाला बसू शकतो, असे वक्तव्य केल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सीईटी कक्षाने स्पष्ट केले की, राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) च्या नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडेल.
८५ टक्के जागांचे प्रवेश वेळेतच होणार सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रामुख्याने ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET) चे गुण विचारात घेतले जातात. राज्यातील एकूण जागांपैकी ८५ टक्के जागांवर प्रवेश हे केवळ राज्याच्या सीईटी गुणांच्या आधारे दिले जातात. उर्वरित १५ टक्के जागा या अखिल भारतीय कोट्यासाठी (All India Quota) राखीव असतात, जिथे नीट (NEET UG) परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे ८५ टक्के जागांची मोठी प्रवेश प्रक्रिया विनाविलंब वेळेवरच सुरू राहील. दरम्यान, एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
नीटचे गुण आवश्यक असलेले ‘ते’ ९ अभ्यासक्रम कोणते? महाराष्ट्रात नीट परीक्षेचे गुण अभियांत्रिकीच्या केवळ ९ विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी आणि १७ शासनमान्य संस्थांमध्येच ग्राह्य मानले जातात. २१ जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेच्या निकालानंतर या जागांचे प्रवेश निश्चित होतील. हे ९ अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत: १. कृषी अभियांत्रिकी (Agricultural Engineering) २. जैवतंत्रज्ञान (Biotechnology) ३. फूड इंजिनिअरिंग (Food Engineering) ४. लेदर इंजिनिअरिंग (Leather Engineering) ५. पॅकेजिंग टेक्नॉलॉजी (Packaging Technology) ६. फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग (Pharmaceutical Engineering) ७. फॅशन टेक्नॉलॉजी (Fashion Technology) ८. प्रिंटिंग इंजिनिअरिंग (Printing Engineering) ९. टेक्सटाईल केमिस्ट्री (Textile Chemistry)
हे विशिष्ट अभ्यासक्रम वगळता इतर सर्व मुख्य अभियांत्रिकी शाखांचे (उदा. कॉम्प्युटर, आयटी, मेकॅनिकल, सिव्हिल) प्रवेश नियमित वेळापत्रकानुसारच वेळेत पार पडतील, असे स्पष्ट करत सीईटी सेलने पालकांना दिलासा दिला आहे.

