
पुणे (pragatbharat.com) : गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज दुपारी मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rain) जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची व वाहनचालकांची काही प्रमाणात तारांबळ उडाली असली, तरी वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत होते, मात्र पाऊस हुलकावणी देत होता. आज सकाळपासूनच शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांसह मध्यवर्ती भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. या जोरदार पावसामुळे पुण्यातील कोंढवा परिसरातील ज्योती चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले, ज्यातून वाहनचालकांना कसरत करत वाट काढावी लागली. तसेच जिल्ह्याच्या भोर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भरदुपारी झाला अंधार पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीमध्ये दुपारी चारच्या सुमारास हवामानात कमालीचा बदल झाला. आकाश काळ्याकुट्ट ढगांनी वेढले गेल्यामुळे भरदुपारी चार वाजता थेट अंधारमय वातावरण तयार झाले होते. यानंतर शहरात तुफान पाऊस कोसळला. गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या पिंपरी चिंचवडकरांची पावसाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांना जागोजागी आडोसा शोधत ताटकळत उभे राहावे लागले.
पुढील दोन दिवस पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. केवळ पुणे जिल्हाच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोकणातील रायगड जिल्ह्यामध्येही अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतीकामांना वेग येण्याची शक्यता असली, तरी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून बळीराजाची चिंताही काही प्रमाणात वाढली आहे.


