
मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल आणि मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदे हे दोन्ही दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एका मोठ्या प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहेत. दिग्दर्शक चेट्टन डीके यांच्या बहुप्रतिक्षित आणि सामाजिक-राष्ट्रीय विषयावर आधारित ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉयझन इन प्रोग्रेस’ (The India Story: Slow Poison in Progress) या चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट अखेर घोषित करण्यात आली आहे. हा चित्रपट चालू वर्षी २४ जुलै २०२६ रोजी जगभरात एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.
शेती आणि कीटकनाशकांच्या वापराचे धक्कादायक वास्तव ‘एमआयजी प्रॉडक्शन्स अँड स्टुडिओ’ने (MIG Productions) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचे एक अत्यंत विचार करायला लावणारे पोस्टर शेअर करत ही घोषणा केली आहे. “जी जमीन तुम्हाला अन्न देते, तीच जमीन तुम्हाला दफनही करते,” अशा आक्रमक टॅगलाईनसह या चित्रपटाचे कथानक समोर आणले गेले आहे.
सागर बी. शिंदे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आपल्या देशातील शेती व्यवस्थेमध्ये होणारा रासायनिक कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा ‘स्लो पॉयझन’सारखा (हळूहळू मरणारे विष) घातक परिणाम या अत्यंत गंभीर विषयावर प्रकाश टाकतो. कोणत्याही एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची कथा न मांडता, हा चित्रपट देशातील लाखो लोकांच्या जीवनाशी जोडलेल्या मोठ्या संकटाचे आणि औद्योगिक निष्काळजीपणाचे वास्तव समोर आणणार आहे.
तीन भाषांमध्ये होणार प्रदर्शित ‘झी स्टुडिओ’च्या सहकार्याने सादर केला जाणारा हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन प्रमुख भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा अधिकृत टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्यासोबतच या चित्रपटाला मंगेश धाकडे यांचे संगीत लाभले असून, आशिष म्हात्रे यांनी संकलन (Editing) केले आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता समाजाला एका मोठ्या धोक्याविषयी जागरूक करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

