
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत वेगाने आणि गुप्तपणे मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, २४ मे रोजी अत्यंत गोपनीयतेने अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली असून, तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात शिंदेंनी आपल्या अधिकृत सहाय्यकांना दूर ठेवत, राज्याचे एक माजी मंत्री आणि बडे ‘शिक्षणसम्राट’ असलेल्या नेत्याला सोबत नेल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
पहिले नकार, मग अचानक बोलवणं! अवघ्या चार दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अधिकृत दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी अमित शाह यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे शिंदेंची भेट होऊ शकली नव्हती. या न झालेल्या भेटीमुळे शिंदे काहीसे अस्वस्थ होते आणि त्यांनी भेटीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर शनिवारी रात्री उशिरा अमित शाह यांच्याकडून रविवारी भेटीसाठी येण्याचा निरोप आला. हा निरोप मिळताच शिंदेंनी कोणतीही वेळ न दवडता खाजगी विमानाने तातडीने दिल्ली गाठली आणि अमित शाह यांच्यासोबत सुमारे अर्धा तास महत्त्वाची चर्चा केली. या बैठकीनंतर शिंदे थेट बंगळुरूला गेले व तेथून ठाण्यात परतले.
महायुतीत जागांचा तिढा आणि नव्या उमेदवारांची चर्चा: या गोपनीय भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी फोनवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या महायुतीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही जागा प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जर ही जागा भाजपने घेतली, तर तिथून काँग्रेसमधून आलेले कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा मानस असल्याची चर्चा सुरू आहे. या वेगवान घडामोडींमुळे महायुतीसह विरोधकांच्या गोटातही खळबळ उडाली आहे.


