पुण्यात रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाऊ गल्ल्या बंद! पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे कडक आदेश; १४ दिवस जमावबंदी

पुणे (pragatbharat.com) : पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील फेरीवाले आणि खाऊ गल्ल्या रात्री १० वाजल्यानंतर बंद करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. शनिवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून १० वाजता सर्व फेरीवाल्यांना व्यवहार बंद करावे लागणार आहेत. मात्र, मोठ्या हॉटेल्सना रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित सवलत असणार आहे.

गुन्हेगारी वाढल्याचे ‘नेरेटिव्ह’ खोटे – पोलीस आयुक्त: पुण्यातील बालाजीनगर परिसरात रिक्षाचालकावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर शहरात भीतीचे वातावरण होते. मात्र, आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले की, पुण्यात गुन्हेगारी वाढल्याचे पसरवले जाणारे ‘नेरेटिव्ह’ पूर्णपणे खोटे आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. नुकतीच झालेली गोळीबाराची घटना ही टोळीप्रमुख सूर्यकांत आंदेकर याच्या सांगण्यावरून पूर्ववैमनस्यातून घडली होती. पोलिसांनी १०० हून अधिक गुन्हेगारांना जेरबंद केले असून, ‘डायल १११’ वरून कॉल आल्यानंतर पोलीस अवघ्या ७ मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत.

१४ दिवस जमावबंदी आणि बेपत्ता मुलींचा शोध: शहरात २६ मे पासून पुढील १४ दिवसांसाठी नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. इंधन तुटवड्यावरून राजकीय संघटनांकडून होणारी आंदोलने आणि सण-उत्सवांच्या काळात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचदरम्यान आयुक्तांनी बेपत्ता मुलींच्या तपासाबाबत माहिती दिली. शहरात बेपत्ता झालेल्या ४९ मुलींपैकी ३८ मुलींचा पोलिसांनी २४ तासांत शोध घेतला आहे. यातील ९९ टक्के मुली प्रेमसंबंधातून, तर केवळ १ टक्का मुली ‘रील्स’ बघून प्रभावित होऊन घर सोडून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *