
मुंबई/कल्याण (pragatbharat.com) : सायबर गुन्हेगारांचे जाळे किती भयानक पसरले आहे, याचा प्रत्यय आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलला सायबर भामट्यांनी शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने अवघ्या साडेपाच तासांत ७६,७१९ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकारानंतर भायखळा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
फेसबुकवरून ‘टेलेग्राम’च्या जाळ्यात: शहाड येथील रहिवासी असलेल्या वर्षा ताजने (वय ३०) या फेसबुक स्क्रोल करत असताना त्यांना “Trade with Prateek Sahni” नावाच्या टेलेग्राम ग्रुपची लिंक दिसली. या ग्रुपमध्ये स्टॉक मार्केट ट्रेडिंगद्वारे अवघ्या ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ३०,००0 रुपये आणि १० हजारांवर ६०,००० रुपयांचा परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी सुरुवातीला ५ हजार रुपये भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले.
कमिशन आणि जीएसटीच्या नावाखाली वसुली: पैसे जमा होताच सायबर चोरांनी कमिशन, जीएसटी (GST), पेमेंट एरर आणि फॉरेक्स कन्व्हर्जन चार्जेसच्या नावाखाली वारंवार पैशांची मागणी सुरू केली. फसवणूक करणाऱ्यांनी जिओ पेमेंट बँकेतून ९९,९९९ रुपये ट्रान्सफर झाल्याचा एक बनावट स्क्रीनशॉटही पाठवला आणि खाते व्हेरिफिकेशन फेल झाल्याचे सांगत आणखी २९,५४४ रुपयांची मागणी केली. शेवटी युपीआय (UPI) ची मर्यादा संपल्यामुळे त्यांनी पैसे पाठवणे बंद केले आणि हा प्रकार पतीला सांगून १९३० सायबर हेल्पलाईन व राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवली. प्राथमिक तपासात कॉन्स्टेबल ताजने यांनी ५ ट्रान्झॅक्शनद्वारे पैसे पाठवले असून, ते निखिल कुमार आणि प्रेम कुमार यांच्या नावावरील बँक खात्यात जमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


