
ठाणे/मुंब्रा (pragatbharat.com) : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात एका सामूहिक विवाह सोहळ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या वडिलांच्या संमतीशिवाय हा विवाह घडवून आणल्याप्रप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी सामूहिक विवाहाचे आयोजक, काझी आणि मुलीच्या आईसह एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
आधार कार्डवरून वयाचा खुलासा: पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील सोनाजी नगर भागात २ डिसेंबर रोजी एका सामूहिक ‘निकाह’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तक्रारदार सामाजिक कार्यकर्त्याच्या संशयानंतर जेव्हा मुलीच्या आधार कार्डची (Aadhaar Card) तपासणी करण्यात आली, तेव्हा तिची जन्मतारीख ३० सप्टेंबर २००८ असल्याचे समोर आले. म्हणजेच लग्नाच्या वेळी ती १८ वर्षांपेक्षा कमी वयाची (अल्पवयीन) होती. याप्रकरणी पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, आरोपींमध्ये विवाह लावणारे काझी, वधूची आई, वर आणि एका शाळा प्राचार्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नसून मुंब्रा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दुसरी घटना: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक कल्याणमधील कोळसेवाडी भागात २७ वर्षीय विवाहित महिलेला कायदेशीर घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे खोटे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय आरोपीला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला मूळची उत्तर प्रदेशची असून सप्टेंबर २०२४ ते एप्रिल २०२६ दरम्यान आरोपीने विविध लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच ती गरोदर राहिल्यावर तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी जाब विचारला असता त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी कोनगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.


