
मुंबई/पुणे (pragatbharat.com) : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा ड्रग तस्करीच्या धंद्यात सक्रिय होणाऱ्या अट्टल गुन्हेगारांविरोधात कडक मोहीम उघडली आहे. पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (PIT-NDPS Act, 1988) कठोर कलमांअन्वये मोठी कारवाई करत, चेंबूर आणि धारावी परिसरातील दोन मोठ्या ड्रग तस्करांना ताब्यात घेऊन त्यांची पुढील एक वर्षासाठी थेट पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. चालू वर्षात ‘एएनसी’ने अट्टल तस्करांवर केलेली ही आठवी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई आहे.
१. पहिली कारवाई: चेंबूरचा फारुख खान गजाआड चेंबूरचा रहिवासी असलेला ४१ वर्षीय फारुख खान याच्याविरुद्ध २०२१ पासून भोईवाडा, विनोबा भावे नगर, कोपरखैरणे आणि आझाद मैदान एएनसी युनिटमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीत अटक झाल्यानंतर त्याने न्यायालयातून जामीन मिळवला होता. मात्र, जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा अंमली पदार्थांची विक्री सुरू केली. त्यामुळे एएनसीच्या आझाद मैदान युनिटने पाठवलेल्या विशेष प्रस्तावाला राज्य गृह विभागाने मंजुरी दिल्यानंतर, त्याला बुधवारी ताब्यात घेऊन वर्षभरासाठी येरवडा जेलमध्ये धाडण्यात आले.
२. दुसरी कारवाई: ८ गुन्हे दाखल असलेला धारावीचा इक्बाल शेख जेरबंद दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत, एएनसीच्या वरळी युनिटने धारावीतील कुंभारवाडा येथील रहिवासी असलेल्या ३६ वर्षीय इक्बाल मोहम्मद अली शेख याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली असता, २०२० ते २०२५ दरम्यान त्याच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे तब्बल ८ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. वारंवार अटक होऊन आणि जामीन मिळवूनही त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सोडली नाही. अखेर कडक कलमांखाली त्यालाही अटक करून एक वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे.
ही संपूर्ण धडक मोहीम मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (ANC) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडाकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.


