
मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या १९ व्या मोसमातील थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मंगळवारी झालेल्या ‘क्वालिफायर १’ च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सवर (GT) मात करत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यानंतर आता आज, २७ मे रोजी चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे ते ‘एलिमिनेटर’ (Eliminator) सामन्याकडे. या महामुकाबल्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणाऱ्या संघाला ‘क्वालिफायर २’ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, तर पराभूत होणाऱ्या संघाचा आयपीएलमधील प्रवास इथेच संपणार आहे.
या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स याच्याकडे सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा असेल, तर युवा फलंदाज रियान पराग राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना दिसेल.
सामन्याची वेळ, ठिकाण आणि थेट प्रक्षेपण:
- सामना कधी होणार?: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा एलिमिनेटर सामना आज, बुधवारी (२७ मे २०२६) खेळवला जाईल.
- सामना कुठे होणार?: हा सामना न्यू चंडीगड येथील ‘महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम’ (मुल्लानपूर) येथे पार पडणार आहे.
- वेळ काय असेल?: सामन्याला संध्याकाळी ७:३० वाजता सुरुवात होईल, तर ७:०० वाजता नाणेफेक (टॉस) होईल.
- थेट प्रक्षेपण कुठे पाहावे?: हा सामना टीव्हीवर ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’च्या चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच मोबाईल आणि डिजिटलवर ‘जिओ हॉटस्टार’ (Jio Hotstar) ॲपद्वारे सामन्याचे थेट डिजिटल प्रक्षेपण विनामूल्य पाहता येईल.
‘हेड टू हेड’ रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड? आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही संघांमधील एकूण आकडेवारी पाहिली तर सनरायझर्स हैदराबादचा दबदबा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये हैदराबादने १४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर राजस्थान रॉयल्सला केवळ ९ सामन्यांत यश आले आहे. आजच्या ‘करा किंवा मरा’ च्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.


