
मुंबई (pragatbharat.com) : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) दक्षिण मुंबईतील एका उच्चभ्रू निवासी इमारतीमध्ये सुरू असलेल्या छुप्या ड्रग्स कारखान्याचा (Clandestine Lab) पर्दाफाश केला आहे. एएनसीच्या कांदिवली युनिटने अग्रीपाडा परिसरातील ‘यास्मिन टॉवर’मध्ये टाकलेल्या छाप्यात तब्बल ५० कोटी ७४ लाख रुपये किमतीचे ‘मेफेड्रोन’ (MD) ड्रग्स, त्याचे कच्चे साहित्य आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत एका बांगलादेशी महिलेसह तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शोएब मन्सूरी (३३), सुफियान मन्सूरी (२९) आणि मामुनी सरकार (२३) अशी आहेत. आरोपी मामुनी सरकार ही बांगलादेशी नागरिक असून ती मुख्य आरोपी शोएबची मैत्रीण असल्याची माहिती समोर आली आहे.
फ्लॅट क्रमांक १००४ मध्ये सुरू होते निर्मिती केंद्र कांदिवली ‘एएनसी’ला अग्रीपाडा येथील यास्मिन टॉवरच्या १० व्या मजल्यावरील फ्लॅट नंबर १००४ मध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याची ठोस माहिती मिळाली होती. त्यानुसार २५ मे रोजी पोलिसांनी तिथे सापळा रचून धाड टाकली. या निवासी फ्लॅटमध्ये व्यावसायिक स्तरावर ड्रग्स बनवण्याची पूर्ण यंत्रणा कार्यान्वित होती. पोलिसांनी घटनास्थळावरून ६.१८८ किलो पावडर स्वरूपातील एमडी आणि ८.३०५ किलो लिक्विड स्वरूपातील एमडी असा एकूण १४.४९३ किलो साठा जप्त केला. याशिवाय, घरातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत.
कारवाई टाळण्यासाठी घेतली जात होती खबरदारी निवासी भागात ड्रग्स तयार करताना येणारा उग्र वास बाहेर जाऊ नये आणि शेजाऱ्यांना संशय येऊ नये, यासाठी आरोपींनी फ्लॅटमध्ये २४ तास वातानुकूलित यंत्रणा (AC) सुरू ठेवली होती. तसेच वासाची तीव्रता कमी करण्यासाठी घरात सतत अगरबत्त्या आणि वेगवेगळ्या सुवासिक स्प्रेचा वापर केला जात होता. प्राथमिक चौकशीत, आरोपींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे ड्रग्स बनवण्याचे तंत्र शिकल्याची कबुली दिली आहे. मुख्य आरोपी शोएब हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरी आणि मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी उत्पादन वाढवण्यासाठी एखाद्या फार्महाऊसच्या शोधात होते, मात्र त्यापूर्वीच मुंबई गुन्हे शाखेच्या ‘एएनसी’ पथकाने त्यांचा डाव उधळून लावला.


