
मुंबई/पुणे (pragatbharat.com) : “भारतीय प्रशासकीय सेवा ही देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. स्पर्धा परीक्षांची प्रशिक्षण केंद्रे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेची तयारी करून देत नाहीत, तर त्यांच्यात नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवत असतात. राष्ट्रीय प्रशासन व्यवस्थेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आणि विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, पुणे येथे नवीन ‘राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था’ (SIAC) सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केली आहे.
राज्य प्रशासकीय व्यावसायिक शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संघ लोक सेवा आयोग (UPSC) परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या भव्य सत्कार समारंभात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे आणि सहसंचालक रुपेश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रशिक्षण शाखांची व्याप्ती वाढवणार: कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, यूपीएससी ही केवळ नोकरी मिळवण्याची परीक्षा नसून राष्ट्रसेवेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची मोठी संधी आहे. नवीन अधिकाऱ्यांनी काम करत असताना जनसामान्यांचे प्रश्न सोडून लोकमान्यता मिळवावी. प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांना अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रशिक्षण शाखांची व्याप्ती वाढवली जाईल. तसेच दिल्ली येथे राहून अभ्यास करणाऱ्या मराठी प्रशिक्षणार्थ्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलत आहे.
महाराष्ट्राच्या प्रशासकीय आकांक्षांचे प्रतीक – SIAC उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी संस्थेच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. ५० वर्षांपूर्वी केंद्रीय प्रशासकीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यंत कमी होते. ही दरी भरून काढण्यासाठी १९७६ मध्ये राज्य शासनाने मुंबईत ‘राज्य प्रशासकीय व्यावसायिक शिक्षण संस्थेची’ (SIAC) स्थापना केली. त्यानंतर या मोहिमेचा विस्तार करत १९८४ मध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि कोल्हापूर येथे, तर २०१३ मध्ये नाशिक आणि अमरावती येथे नवीन केंद्रे सुरू करण्यात आली. आता पुण्यात नवीन केंद्र सुरू होणार असल्याने स्पर्धा परीक्षांचा गड मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.



