
नवी दिल्ली (pragatbharat.com) : आपल्या समर्पित आणि अथांग लोकसेवेने महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावणारे पदमश्री जनार्दन बोथे यांचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनात विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला यांच्या हस्ते बोथे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन जाहीर सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संचालक (माहिती) हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आणि व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते.
हा सत्कार म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा गौरव: आपल्या सत्काराला भावुक उत्तर देताना पद्मश्री जनार्दन बोथे म्हणाले, “देशाच्या राजधानीत आणि विशेषतः आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र सदनात झालेला हा सत्कार माझ्यासाठी घरच्या कौतुकासारखा आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ माझ्या एकट्याचा सन्मान नसून, माझ्या जीवनात आलेले महान संत, स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव आहे.”
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या अमरावतीच्या गुरुकुंज आश्रमातून हजारो विद्यार्थी आणि कार्यकर्ते देशाची संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम जगवण्यासाठी अविरत काम करत आहेत. त्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत मला काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली, म्हणूनच आज मी या सर्वोच्च नागरी पुरस्कारापर्यंत पोहोचू शकलो.
तरुण पिढीसाठी प्रेरणादायी कार्य: याप्रसंगी बोलताना निवासी आयुक्त आर. विमला यांनी जनार्दन बोथे यांच्या दीर्घ सामाजिक कार्याचा गौरव केला. महाराष्ट्राच्या मातीतून देशपातळीवर चमकणाऱ्या अशा ज्येष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करण्याची संधी मिळणे हे महाराष्ट्र सदनाचे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर, संचालक हेमराज बागुल यांनी बोथे यांचे सामाजिक कार्य हे सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या नवीन तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी दीपस्तंभ असल्याचे सांगितले. या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्र सदनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



