सोलापूरमधील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्येची आत्महत्या; स्वतःच्याच हॉटेलमध्ये संपवले जीवन, मंगळवेढा हादरले

सोलापूर (pragatbharat.com) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी निलेश पाराध्ये हिने मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील स्वतःच्याच हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ज्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात तिने अनेक लोकप्रिय रील्स बनवून चाहत्यांची मने जिंकली, त्याच ठिकाणी तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सोशल मीडिया विश्वात आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

रोहिणी आणि तिचा पती निलेश पाराध्ये हे दोघेही सोशल मीडियावर रील स्टार म्हणून गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झाले होते. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ ब्रह्मपुरी येथे त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या नावाने स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. ग्रामीण जीवनशैली, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आणि विविध सामाजिक विषयांवर त्यांनी तयार केलेले रील्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरायचे. हॉटेलचा व्यवसाय चांगला चालत असल्याने त्यांनी नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजनही केले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हॉटेलच्या स्वयंपाक खोलीत रोहिणीने गळफास घेतला. ही घटना उघडकीस येताच तिचा पती निलेशने तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. रोहिणीच्या या अचानक जाण्याने तिच्या लाखो चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

रोहिणीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार मानसिक तणाव आणि नैराश्यातून तिने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पोलीस अधिकारी या घटनेचा अधिक सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *