
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि वादळ निर्माण करणारे वक्तव्य समोर आले आहे. राज्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधानसभा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नागरिकांना पैसे गुंतवणूक न करण्याचा धक्कादायक सल्ला दिला आहे. देशातील बँका आणि रिझर्व्ह बँक रिकामी झाली असून, भविष्यात पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’सारखे कठीण दिवस येऊ शकतात, असा दावा त्यांनी केल्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी देशातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढीवर बोट ठेवत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “देशात रोजच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे भाव वाढत असून सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळत आहे. रिझर्व्ह बँकेचा पैसा स्वतःच्या मालकीचा असल्यासारखा काढून घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कुठेही फार मोठी गुंतवणूक करू नका; गुंतवलेला पैसा परत मिळणार नाही. असलेले पैसे सुरक्षित ठेवा, कारण भविष्यात बँका पूर्णतः उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. सध्या केवळ इव्हेंटवर भर दिला जात असून देश आर्थिक संकटात आहे.”
विधानपरिषद निवडणूक आणि उमेदवारांची पळवापळवी यावेळी वडेट्टीवार यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आणि मतदारांच्या पळवापळवीवरही सत्ताधारी महायुतीला टोला लगावला. “भाजपचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही, त्यांच्यात अंतर्गत वाटाघाटी सुरू आहेत. कोण कुठे गेले हे मला सांगण्याची गरज नाही; एकदा का विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार फायनल झाले की सगळे परत येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर तीव्र आक्षेप कल्याण येथे बकरी ईदच्या दिवशी झालेल्या सामाजिक तणावाच्या घटनेवर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. देशात मुद्दाम दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा धंदा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “मंत्री असंवेदनशील झाले असून, सर्वसामान्य हिंदू-मुस्लिम नागरिक महागाई आणि रोजगाराच्या प्रश्नांनी त्रस्त आहे. मात्र, मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी जनतेच्या भावना भडकवून तणाव निर्माण केला जात आहे,” अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली. त्यांच्या या विधानानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



