Don 3 Movie Controversy: रणवीर सिंगच्या ‘सीक्रेट डील’वर दिग्दर्शक फरहान अख्तरने फेरले पाणी; चित्रपट सोडल्याने ४५ कोटींचे नुकसान, थेट FWICE कडे तक्रार

मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डॉन ३’ (Don 3) या चित्रपटावरून सध्या सिनेविश्वात आणि सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे. ऐन शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच मुख्य अभिनेता रणवीर सिंगने या बिग बजेट प्रोजेक्टमधून माघार घेतल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. रणवीरच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक फरहान अख्तर व रितेश सिधवानी यांना तब्बल ४५ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. याप्रकरणी आता फरहानने थेट ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या ताज्या वृत्तानुसार, हा वाद मिटवण्यासाठी आणि प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून रणवीर सिंगच्या टीमने फरहान अख्तरला एक ‘सीक्रेट डील’ ऑफर केली होती. या डील अंतर्गत रणवीरने एक्सेल एंटरटेन्मेंटला ३५ कोटी रुपयांची मोठी ऑफर दिली होती. यामध्ये त्याने १० कोटी रुपये रोख परत करणे आणि भविष्यात एक्सेल एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली बनणाऱ्या कोणत्याही चित्रपटासाठी आपल्या मानधनात २५ कोटी रुपयांची सूट देणे, अशी ही तडजोड होती.

फरहानने फेटाळली ऑफर; भविष्यात एकत्र काम न करण्याचा निर्णय दिग्दर्शक फरहान अख्तर आणि निर्माते रितेश सिधवानी यांनी रणवीर सिंगची ही कोट्यवधी रुपयांची ‘सीक्रेट डील’ साफ नाकारली आहे. शूटिंगमधील सततचा विलंब, अंतर्गत वाद आणि ऐनवेळी निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे निर्मिती संस्थेचे मोठे व्यावसायिक नुकसान झाले आहे. त्यामुळे रागाच्या भरात फरहानने थेट फेडरेशनकडे धाव घेतली.

फेडरेशनच्या (FWICE) महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आता चित्रपटसृष्टीत रणवीर सिंगविरोधात असहकाराचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, एक्सेल एंटरटेन्मेंटने फेडरेशनला स्पष्ट केले आहे की, गेल्या दोन वर्षांतील कटू अनुभव पाहता ते भविष्यात कधीच रणवीर सिंगसोबत काम करणार नाहीत. या मोठ्या वादानंतर आता ‘डॉन ३’ चित्रपटाचे भवितव्य काय असणार आणि रणवीर ऐवजी आता कोणता नवा अभिनेता ‘डॉन’च्या भूमिकेत दिसणार, याकडे सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *