ENGW vs INDW 1st T20i: भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघात आजपासून टी-२० मालिकेचा थरार; जाणून घ्या कधी, कुठे आणि किती वाजता रंगणार पहिला सामना | India Women vs England Women T20 Match Time 2026

लंडन (pragatbharat.com) : येत्या १२ जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ (ICC Women’s T20 World Cup) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय महिला क्रिकेट संघासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली टी-२० मालिका आजपासून सुरू होत आहे. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या वुमन्स टीम इंडियाच्या या मोहिमेची सुरुवात आज, गुरुवार २८ मे २०२६ रोजी पहिल्या टी-२० सामन्याने होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौर करत असून, स्मृती मंधाना उपकर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. तर यजमान इंग्लंड संघाची कमान शार्लट डीन हिच्या हाती आहे.

कधी आणि कुठे होणार सामना? भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील हा पहिला टी-२० सामना आज, २८ मे रोजी चेल्म्सफोर्ड येथील काउंटी ग्राउंडवर खेळवला जाणार आहे.

सामन्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना रात्री उशिरा रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार (IST) रात्री ११:०० वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर तत्पूर्वी रात्री १०:३० वाजता टॉस (नाणेफेक) होणार आहे. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या (Sony Sports Network) विविध चॅनेल्सवर थेट पाहता येईल. तसेच मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहण्यासाठी सोनी लिव्ह (SonyLIV) ॲपवर डिजिटल स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि जुना हिशोब: दोन्ही देशांमधील आकडेवारीचा विचार केला तर इंग्लंडचे पारडे जड राहिले आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. यापैकी २४ सामन्यांत इंग्लंडने बाजी मारली आहे, तर टीम इंडियाला केवळ ११ सामन्यांत विजय मिळवता आला आहे.

मात्र, गेल्या वर्षी झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाने इंग्लंडचा त्यांच्याच मायभूमीत ३-२ असा पराभव करून ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला होता. त्यामुळे यंदा इंग्लंडचा संघ या पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक असेल, तर भारतीय संघ वर्ल्ड कपपूर्वी आपला विजयी फॉर्म राखण्यासाठी मैदानात उतरेल. या दौऱ्यात भारतीय संघ एकूण ४ टी-२० सामने आणि एक कसोटी सामना खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *