
पुणे (pragatbharat.com) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेत्या आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना एक खळबळजनक पत्र लिहिले आहे. मीरारोड येथील एका घटनेचा संदर्भ देत, पुण्यातही काही कट्टर आणि समाजविघातक प्रवृत्तीचे घटक निवासी सोसायट्यांमध्ये बेकायदेशीरपणे बकऱ्यांची कुर्बानी (पशुबळी) देण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर दावा त्यांनी या पत्रातून केला आहे. यामुळे पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
माधुरी मिसाळ यांनी पत्रात नमूद केले आहे की, “मीरा-भाईंदर परिसरात निवासी सोसायट्यांमध्ये सार्वजनिक स्वरूपात बकरे आणून उघड्यावर पशुबळी देण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण होऊन सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता असते. पुणे हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. मात्र, पुण्यातही काही कट्टर प्रवृत्तीचे घटक कोणत्याही प्रशासकीय परवानगीशिवाय आणि आरोग्याचे निकष न पाळता निवासी भागात असे प्रकार करण्याच्या तयारीत आहेत. ही बाब सार्वजनिक आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे.”
धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तनाचा गंभीर मुद्दा या पत्रात राज्यमंत्री मिसाळ यांनी केवळ पशुबळीचाच नव्हे, तर महिलांच्या सुरक्षेचाही एक अत्यंत संवेदनशील मुद्दा उपस्थित केला आहे. विविध सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली महिलांशी गैरवर्तन, छेडछाड आणि अश्लील वर्तनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महिलांचे संरक्षण करण्यासाठी अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पुणे शहर पोलीस, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून अशा बेकायदेशीर प्रकारांना वेळीच पायबंद घालावा, अशी आग्रही मागणी मंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे. या पत्रावर आता पुणे पोलीस आणि पालिका प्रशासन काय कडक पावले उचलणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.




