CBSE Class 12 Re-Evaluation 2026: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा; त्रुटींनंतर १२ वीच्या गुणांची फेरतपासणी सुरू होणार

नवी दिल्ली (pragatbharat.com) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता १२ वीच्या परीक्षा मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही गंभीर त्रुटी आणि हरकती समोर आल्यानंतर केंद्र सरकारने यावर एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिकांची फेरमूल्यांकन प्रक्रिया (Re-evaluation Process) अधिकृतपणे सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे.

मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या चुकांची आणि विसंगतींची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले की, “या सर्व त्रुटी तातडीने दुरुस्त केल्या जातील आणि त्यावर योग्य ते सकारात्मक तोडगे काढले जातील. कोणत्याही विद्यार्थ्याची शंका किंवा तक्रार अनुत्तरीत राहणार नाही याची दक्षता अधिकारी घेतील, तसेच या प्रक्रियेत सर्व स्तरांवर जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाईल.”

पहिल्यांदाच राबवली ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (OSM) पद्धत यावर्षीच्या मूल्यमापन प्रक्रियेविषयी माहिती देताना शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की, सीबीएसईने यंदा देशात पहिल्यांदाच ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (OSM) ही प्रगत आणि आधुनिक प्रणाली लागू केली आहे. भारतातील अनेक नामांकित विद्यापीठे, संस्था तसेच जागतिक स्तरावर ही डिजिटल प्रणाली वापरली जात आहे. या पहिल्याच प्रयोगांतर्गत सीबीएसईने तब्बल ४० कोटी स्कॅन केलेली पाने ओएसम (OSM) प्रक्रियेद्वारे तपासली आहेत.

एक नवीन आणि एवढी अवाढव्य डिजिटल प्रणाली पहिल्यांदाच राबवताना काही तांत्रिक अडचणी व त्रुटी समोर आल्या आहेत. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी दिला. या फेरमूल्यांकनाच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता गुणांमध्ये सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *