
गँगटोक (pragatbharat.com) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सिक्कीमची राजधानी गँगटोक येथील पालजोर स्टेडियमवर आयोजित एका भव्य ‘अलंकरण परेड’ सोहळ्यात सिक्कीम पोलिसांना देशातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेंट पोलीस Colour’ (राष्ट्रपतींचे पोलीस निशाण) बहुमान प्रदान केला. या ऐतिहासिक कामगिरीसह सिक्कीम हे हा बहुमान मिळवणारे देशातील १५ वे राज्य ठरले आहे, तर ईशान्य भारतातील (North East) हे केवळ तिसरे राज्य ठरले आहे.
हा सर्वोच्च सन्मान पोलीस दलाने देशसेवेसाठी दाखवलेले अतुलनीय शौर्य, अढळ शिस्त आणि समर्पित सेवेची दखल घेऊन दिला जातो. याप्रकरणी सिक्कीम पोलिसांचे कौतुक करताना राष्ट्रपतींनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध नैसर्गिक आपत्तींच्या काळात सिक्कीम पोलिसांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा विशेष गौरव केला.
सायबर गुन्हे आणि डीपफेकचे आव्हान पेलण्याचे आवाहन कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पोलीस दलाला अधिक ‘नागरिक-केंद्रित’ (Citizen Centric) बनण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “पोलीस दलाने सर्वसामान्यांशी, विशेषतः महिला, गरीब आणि बालकांशी अत्यंत संवेदनशीलतेने वागले पाहिजे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाला सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.”
बदलत्या काळातील आधुनिक गुन्हेगारीचा उल्लेख करत राष्ट्रपतींनी पोलिसांना तंत्रज्ञानाने सुसज्ज राहण्याचा सल्ला दिला. आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे (Cybercrime), ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) आणि डीपफेक (Deepfake) यांसारख्या गंभीर आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर आणि आधुनिक साधनांनी सज्ज राहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिक्कीम पोलीस या सर्व आव्हानांना तोंड देत देशात एक नवा आदर्श निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



