Bihar Politics: कितीही फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही! राबडी देवींचे बिहार सरकारला खुलं आव्हान; पाटण्यात राजकीय भूकंप

पुणे (pragatbharat.com) : बिहारच्या राजकारणातून सध्या एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi) यांना पाटण्यातील त्यांचा ऐतिहासिक ’10 सर्कुलर रोड’ हा सरकारी बंगला सोडण्याचा आदेश बिहार सरकारने दिला आहे. मात्र, राबडी देवी यांनी हा बंगला सोडण्यास साफ नकार दिला असून यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. पाटणा विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला थेट आणि खुलं आव्हान देत, कितीही फोर्स बोलवा पण बंगला सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

नातू इराज याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून दिल्लीहून पाटण्याला परतताच विमानतळावर पत्रकारांनी त्यांना या आदेशाबाबत विचारले. त्यावर अत्यंत तिखट शब्दांत प्रतिक्रिया देताना राबडी देवी म्हणाल्या, “मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी कितीही पोलीस फोर्स बोलावून घर रिकामं करून दाखवावं, मी कोणत्याही किमतीत हा बंगला सोडणार नाही.” लालू प्रसाद यादव यांचे संपूर्ण कुटुंब गेल्या २० वर्षांपासून म्हणजेच २००५ सालापासून याच ’10 सर्कुलर रोड’ बंगल्यात राहत आहे.

भाजपचा कडाडून हल्ला: “हे आता जंगलराज नाही!” राबडी देवींच्या या विधानावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते नीरज कुमार यांनी जोरदार पलटवार केला आहे. “आता बिहारमध्ये पूर्वीसारखे ‘जंगलराज’ उरलेले नाही, इथे प्रत्येकाला कायद्याचे पालन करावेच लागेल,” असे सांगत नीरज कुमार यांनी थेट सवाल केला की, “शेवटी या ’10 सर्कुलर रोड’च्या बंगल्यात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी असा कोणता खजिना लपवून ठेवला आहे? जर तिथे खजिना दडला असेल, तर बिहार पोलीस तो शोधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.” तर भाजप खासदार भीम सिंह यांनी, हा बंगला रिकामा करण्यासाठी संपूर्ण बिहार पोलिसांची गरज नाही, आमचा एक साधा फौजदार जाऊन हे घर रिकामं करून आणेल, असा टोला लगावला.

जेडीयूची कायदेशीर नियमांची आठवण: बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जेडीयू (JDU) नेते विजय कुमार चौधरी यांनीही या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत राबडी देवी यांना नियमांचे भान करून दिले आहे. “या सरकारी घर वाटप प्रकरणात जे कायदेशीर नियम आहेत, त्याचे सर्वांनाच पालन करावे लागेल. बिहारमध्ये कायद्यानुसारच कामे होतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राबडी देवींना ’39 हार्डिंग रोड’चा नवीन बंगला अलॉट: बिहार सरकारच्या भवन निर्माण विभागाच्या आदेशानुसार, बिहार विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या या नात्याने राबडी देवी यांच्यासाठी पाटण्यातील ’39 हार्डिंग रोड’ येथील नवीन सरकारी आवास अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. हे नवीन घर नावावर जारी झाले असून आणि गेल्या ६ महिन्यांत प्रशासनाने २ ते ३ वेळा लेखी विनंती करूनही लालू कुटुंबीयांनी जुना बंगला सोडलेला नाही. आता यावरून बिहारमधील राजकीय संघर्ष कुठल्या थराला जातो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *