
पॅरिस (pragatbharat.com) : फुटबॉल विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या युईएफए चॅम्पियन्स लीग २०२६ (UEFA Champions League Final) च्या अंतिम सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) संघाने इतिहास रचला आहे. शनिवारी रात्री पार पडलेल्या अत्यंत थरारक अंतिम सामन्यात पीएसजीने आर्सेनलचा (Arsenal) पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा युरोपियन फुटबॉलवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या शतकात सलग दोनदा चॅम्पियन्स लीग जिंकणारा पीएसजी हा रिअल माद्रिदनंतर दुसराच संघ ठरला आहे.
सामन्याचा थरार आणि पेनल्टी शूटआऊट: सामन्याच्या सुरुवातीलाच ६ व्या मिनिटाला आर्सेनलच्या काई हाव्हर्टझने (Kai Havertz) उत्कृष्ट गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. यानंतर आर्सेनलच्या भक्कम बचावामुळे पीएसजीला गोल करणे कठीण झाले होते. मात्र, ६५ व्या मिनिटाला ख्विचा क्वारात्सखेलियावर झालेल्या फाऊलमुळे पीएसजीला पेनल्टी मिळाली, ज्याचे ओसमान डेंबेलेने (Ousmane Dembele) गोलमध्ये रूपांतर करत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. निर्धारित वेळेत आणि अतिरिक्त वेळेतही सामना बरोबरीत राहिल्याने अखेर निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये पीएसजीच्या वतीने केवळ नुनो मेंडेस गोल करू शकला नाही. दुसरीकडे आर्सेनलच्या एबेरेची एझेने मारलेला फटका चुकला, तर गॅब्रिएल मगालहेसने शेवटचा निर्णायक फटका गोलपोस्टच्या वर मारल्याने आर्सेनलचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. या हंगामात चॅम्पियन्स लीगमध्ये आर्सेनलला पराभूत करणारा पीएसजी हा एकमेव संघ ठरला. विशेष म्हणजे, तब्बल १० वर्षांनंतर (२०१६ नंतर) चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला.
‘एकदा जिंकणे कठीण, दोनदा जिंकणे अधिक कठीण’: विजयानंतर बोलताना पीएसजीचा मुख्य प्रशिक्षक लुईस एन्रिक (Luis Enrique) म्हणाला, “हा विजय गेल्या वर्षीपेक्षाही मोठा आहे, कारण आर्सेनलविरुद्ध खेळणे अत्यंत आव्हानात्मक होते. सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतरही संघाने दाखवलेला खेळ कौतुकास्पद आहे.” तर पीएसजीचा कर्णधार मार्किन्होस (Marquinhos) म्हणाला, “आमच्या प्रशिक्षकांनी हंगामाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, एकदा विजेतेपद मिळवणे कठीण असते, पण ते सलग दुसऱ्यांदा जिंकणे त्याहूनही कठीण असते. आम्ही तीच मानसिकता मैदानात दाखवली.” आर्सेनलचा व्यवस्थापक मिकेल आर्टेटा यानेही पीएसजी हा जगातील सर्वोत्तम संघ असल्याचे मान्य करत त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, फ्रान्समध्ये या विजयाच्या जल्लोषादरम्यान काही ठिकाणी हिंसक चकमकी झाल्या असून, देशभरात ७८० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.


