Raja Shivaji vs Deool Band 2 Box Office: ‘देऊळ बंद 2’ ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी, रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला दिली तगडी टक्कर; कमाईचे आकडे थक्क करणारे!

मुंबई (pragatbharat.com) : यंदाचे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत सुवर्णकाळ ठरत असून, एकापाठोपाठ एक प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांना प्रेक्षक थिएटर्समध्ये प्रचंड प्रतिसाद देत आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर मराठीतील दोन सर्वात मोठे चित्रपट समोरासमोर आले आहेत. १ मे रोजी प्रदर्शित झालेला रितेश देशमुखचा ऐतिहासिक ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आणि गेल्या दहा दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद २’ यांच्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, रविवारच्या कमाईच्या बाबतीत ‘देऊळ बंद २’ ने ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे.

‘राजा शिवाजी’ १०० कोटींच्या उंबरठ्यावर; महिनाभर थिएटर्समध्ये दबदबा: १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’ हा मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल एक महिना यशस्वीपणे पूर्ण केला आहे. ‘सॅकनिल्क’च्या (Sacnilk) ताज्या अहवालानुसार, या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ५२.६५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात २४.३० कोटी, तिसऱ्या आठवड्यात १२ कोटी आणि चौथ्या आठवड्यात ४.८० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या २९ व्या दिवशी ३२ लाख, ३० व्या दिवशी ५८ लाख आणि ३१ व्या दिवशी ६८ लाखांची कमाई करत या चित्रपटाने आतापर्यंत ९५.१७ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून तो लवकरच १०० कोटींचा ऐतिहासिक आकडा पार करेल.

‘देऊळ बंद २’ चा १० दिवसांत ५० कोटींचा गल्ला; आयपीएल फायनलमध्येही गर्दी: दुसरीकडे, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत बॉक्स ऑफिसवर वादळ आणले आहे. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत थेट सहावे स्थान पटकावले आहे. रविवारी आयपीएलचा (IPL 2026) अंतिम सामना असूनही प्रेक्षकांनी थिएटर्सबाहेर रांगा लावल्या होत्या. चित्रपटाने १० व्या दिवशी एकाच दिवसात ५ कोटी रुपयांची बंपर कमाई केली, ज्यामुळे गेल्या २४ तासांत त्याच्या गल्ल्यात ६१ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. ‘देऊळ बंद २’ ने अवघ्या १० दिवसांत ५० कोटी रुपयांहून अधिकचा टप्पा पार केला असून रविवारच्या कमाईत ‘राजा शिवाजी’ला मागे टाकले आहे.

‘क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम’, ‘तिघी’, ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद २’ अशा एकामागून एक आलेल्या दर्जेदार चित्रपटांमुळे हिंदी सिनेमांच्या गर्दीतही मराठी चित्रपटांना खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *