Mumbai Malvani Murder Case 2026: चारित्र्याच्या संशयातून ‘लिव्ह-इन’ पार्टनरचा गळा चिरून हत्या; आरोपीला थेट आसाममधून मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई/मालाड (pragatbharat.com) : मुंबईतील मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये (Live-in Relationship) राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून हा भयानक प्रकार घडला असून, गुन्हा केल्यानंतर थेट आसाममध्ये पळून गेलेल्या २९ वर्षीय मुख्य आरोपीला मालवणी पोलिसांनी तांत्रिक देखरेख (Technical Surveillance) आणि गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे.

सोशल मीडियावरील मैत्रीचे थरारात रूपांतर: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शमसुद्दीन अब्दुल मतीन (वय २९, रा. आसाम) आणि मृत महिला सलिमा खातून (वय ३३, रा. कोलकाता) यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते गेल्या दीड वर्षांपासून मालवणी येथील ‘न्यू कलेक्टर कंपाउंड’मध्ये भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. आरोपी शमसुद्दीन हा व्यवसायाने गवंडी (Mason) म्हणून काम करायचा. गेल्या काही दिवसांपासून त्याला सलिमाच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते.

कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह: १९ मे रोजी अशाच एका तीव्र वादानंतर शमसुद्दीनने रागाच्या भरात सलिमावर सुऱ्याने हल्ला करत तिचा गळा चिरला आणि तो घरातून पळून गेला. दोन-तीन दिवस सलिमाचा फोन बंद असल्याने तिच्या बहिणीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी शेजाऱ्यांनी केल्यानंतर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडला असता सलिमाचा कुजलेल्या अवस्थेतील (Semi-decomposed) मृतदेह आढळून आला.

आसामच्या भोजाई जिल्ह्यातून आरोपीला अटक: मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर हत्येची पुष्टी झाली. सलिमाच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढला आणि त्याला थेट आसामच्या ‘भोजाई’ जिल्ह्यातून अटक करून मुंबईत आणले. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपी शमसुद्दीन याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *