
ठाणे (pragatbharat.com) : पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ (ISI) आणि मुंबई अंडरवर्ल्डशी (Underworld) कनेक्शन असलेल्या एका मोठ्या दहशतवादी आणि संघटित गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय संशयित आरोपीला ठाणे न्यायालयाने ५ जून पर्यंत ‘ट्रान्झिट रिमांड’ (Transit Remand) मंजूर केली आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक (Delhi Police Special Cell) आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांनी संयुक्त कारवाई करत या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हुजैफा फारुख अहमद हाश्मी (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. हुजैफा हा पाकिस्तानमधील हस्तक आणि अंडरवर्ल्डमधील काही प्रमुख व्यक्तींच्या थेट संपर्कात असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. ठाण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. कन्नुरकर यांच्या न्यायालयाने बुधवारी तपास यंत्रणांचा ट्रान्झिट रिमांडचा अर्ज मंजूर केला. तसेच, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपी हुजैफाला नवी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात (Patiala House Courts) हजर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवासादरम्यान सर्व कायदेशीर आणि वैधानिक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
अंडरवर्ल्ड आणि आयएसआयच्या लागेबंधांवर तपास केंद्रित न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी हुजैफाविरुद्धचे डिजिटल पुरावे सादर केले, ज्यामध्ये कथित चॅट्सचे स्क्रीनशॉट्स आणि बँक व्यवहारांचे रेकॉर्ड्स समाविष्ट आहेत. तपासात समोर आले आहे की, हुजैफा हा पाकिस्तानातून कार्यरत असलेला आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असलेला संशयित यावर खान याच्या संपर्कात होता. इतकेच नव्हे तर, मुंबई अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडा (जो सध्या कराचीमधून हालचाली करतो) याच्याशीही त्याचे जवळचे संबंध असल्याचा आरोप यंत्रणांनी केला आहे. मुंबई अंडरवर्ल्ड आणि आयएसआय (D-Company – ISI Nexus) यांच्यातील देशविरोधी कारवायांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरात छापे टाकून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.


