
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षण आणि औद्योगिक विकास यातील संघर्षाचा एक मोठा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (४ जून) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे सदस्य सचिव संजय कुमार यांना एक खरमरीत पत्र लिहून गडचिरोली जिल्ह्यातील वाघांचा महत्त्वाचा कॉरिडॉर (Tiger Corridor) बेकायदेशीरपणे खाण क्षेत्रात (Mining Zone) बदलला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करून खाणकाम परवाने रद्द करण्याची आणि वन्यजीव मंडळाच्या निर्णयांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या संदर्भातील माहिती शेअर करताना लिहिले की, “महाराष्ट्र सरकारकडून आणखी एक व्याघ्र कॉरिडॉर खाण क्षेत्रात बदलला जात आहे, तोही पूर्णपणे बेकायदेशीरपणे. यापूर्वी एप्रिल महिन्यात आम्ही लोहारडोंगरी येथील खाणीला दिलेल्या परवानगीविरोधात आंदोलन केले होते, ज्यासाठी पर्यावरणवादी बंधू लाड यांनी ती रद्द होईपर्यंत उपोषण केले होते.” आपल्या पत्रात त्यांनी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळावर (SBWL) अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आणि व्याघ्र हालचालींसाठी राखीव असलेल्या क्षेत्रातील संरक्षणाचे नियम शिथिल केल्याचा थेट आरोप केला आहे.
आदित्य ठाकरेंनी पत्रात मांडलेले तीन प्रमुख मुद्दे: १. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेदरा, बांदे, परसलगोंडी आणि राऊंड-परसलगोंडी या गावांच्या हद्दीतील कमी दर्जाच्या लोहखनिजाच्या उत्खननासाठी आणि वैज्ञानिक शोधासाठी दिलेले सर्व परवाने तातडीने रद्द करण्यात यावेत. २. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ (SBWL) बरखास्त करून गेल्या ३ वर्षांत त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांचे पुनरावलोकन करण्यात यावे; विशेषतः वाघांचे कॉरिडॉर नष्ट करून तेथे घातक उद्योगांना परवानगी देण्याच्या निर्णयांची सखोल चौकशी व्हावी. ३. प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) एम. श्रीनिवास रेड्डी यांनी वन्यजीव संरक्षणाच्या कर्तव्यात कसूर करून विसंगत भूमिका घेतल्याबद्दल त्यांना निलंबित करावे आणि त्यांची चौकशी करावी.
या पत्रामुळे महाराष्ट्रात औद्योगिक कारणांसाठी जंगले आणि वन्यजीव अधिवासांचा बळी दिला जात असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.



