
मुंबई (pragatbharat.com) : सांगली जिल्ह्यातील पेठ येथे स्थापन होणाऱ्या शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाचे (Food Technology College) उर्वरित काम अत्यंत गतीने पूर्ण करून हे महाविद्यालय तातडीने सुरू करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या महाविद्यालयात आवश्यक असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
या उच्चस्तरीय बैठकीला आमदार सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, उपसचिव प्रतिभा पाटील यांच्यासह कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे पदाधिकारी आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, अधिष्ठाते व कुलसचिव उपस्थित होते. बैठकीत महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली की, पेठ (सांगली) येथील या शासकीय महाविद्यालयाची मुख्य प्रशासकीय इमारत, विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अद्ययावत वसतीगृह (Hostel) आणि भव्य ग्रंथालय इमारतीचे स्थापत्य व विद्युत कामे पूर्ण झाली आहेत. आता महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अन्न रसायनशास्त्र (Food Chemistry), सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), आणि अन्न पॅकेजिंग (Food Packaging) यांसारख्या अत्याधुनिक प्रयोगशाळा (Laboratories) उभारल्या जाणार आहेत. या प्रयोगशाळांसाठी आवश्यक असणारा निधी तातडीने मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आमदार सदाभाऊ खोत यांनीही या महाविद्यालयाचे उर्वरित काम कृषी विभागाने युद्धपातळीवर पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक संकुल लवकरात लवकर खुले करण्याची मागणी केली.



