पुण्याच्या तळेगाव एमआयडीसीत भीषण दुर्घटना; शॅफ्लर इंडिया कंपनीत CO₂ गॅस गळतीमुळे दोन मजुरांचा गुदमरून मृत्यू, ३ जण गंभीर

पुणे (pragatbharat.com) : मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया (Schaeffler India) कंपनीत कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅसची प्रचंड वेगाने गळती झाल्याने दोघा मजुरांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण दुर्घटनेत अन्य तीन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तळेगाव औद्योगिक परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शॅफ्लर इंडिया कंपनीत दुपारी साडेबाराच्या सुमारास वार्षिक मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंगचे काम सुरू होते. ‘उषा फायर सेफ्टी इक्विपमेंट’ कंपनीचे कंत्राटदार कामगार आणि शॅफ्लर कंपनीचे कर्मचारी हे काम करत होते. यादरम्यान, कार्बन डायऑक्साइड सिलिंडरची सेफ्टी पिन लूझ (Loose Safety Pin) बसवल्या गेल्याने हायप्रेशरने गॅसची गळती सुरू झाली. गॅसचा दाब एवढा प्रचंड होता की क्षणात परिसरात कार्बन डायऑक्साइड पसरला आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने कामगार जागीच बेशुद्ध पडले.

या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह कंपनी प्रशासन आणि एमआयडीसी सुरक्षा यंत्रणेने धाव घेत तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून या गॅस गळतीची कसून चौकशी सुरू असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *