
नाशिक (pragatbharat.com) : नाशिक विधान परिषद निवडणुकीत (Nashik MLC Election) राजकीय वातावरण कमालीचे तापले असून ऐन मतदानाच्या तोंडावर ‘घोडेबाजारा’च्या चर्चांनी वेग घेतला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून शड्डू ठोकणारे उमेदवार गोकुळ गीते यांनी आपल्याला माघार घेण्यासाठी गेल्या ८ दिवसांपासून विविध माध्यमातून प्रलोभने दिली जात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “मी कोणतीही तडजोड करणार नाही आणि कुणाचीही भीक घेणार नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी महायुतीला थेट आव्हान दिले आहे.
फडणवीसांचा फोन, पण गीते शिंदेंच्या भेटीला नाशिकची ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली असून नरेंद्र दराडे येथे निवडणूक लढवत आहेत. गोकुळ गीते यांनी बंडखोरी मागे घ्यावी यासाठी महायुतीचे दोन-दोन मंत्री प्रयत्न करत आहेत. याबाबत बोलताना गीते म्हणाले, “मी प्रचारात असताना माझे बंधू गणेश गीते यांच्या फोनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. मुख्यमंत्र्यांनी मला भेटीसाठी बोलावले होते, मात्र ते सध्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असल्याने मी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. नेत्यांचा मान राखण्यासाठी मी निवडणुकीतून मागे हटू शकतो, पण दराडेंना पाठिंबा देणार नाही.”
“आमदार निष्क्रिय, मतदार माझ्या पाठीशी” नरेंद्र दराडे यांच्यावर थेट हल्लाबोल करताना गोकुळ गीते म्हणाले की, गेल्या ६ वर्षांत इथल्या लोकप्रतिनिधींनी कोणतेही काम केलेले नाही, ते अत्यंत निष्क्रिय आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी असून जनताच मला निवडणूक लढवण्याचा आग्रह करत आहे. दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी मध्यस्थीसाठी आमच्या घरी भेट घेतली होती, पण मी त्यांची भेट नाकारली. सोशल मीडियावर सध्या कुणाल दराडे यांचे वादग्रस्त व्हिडिओ फिरत असून त्यात माझ्या कुटुंबाचा उद्धार करण्यात आला आहे; आधी असे बोलायचे आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही कोणती संस्कृती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अप्रत्यक्षपणे भाजपलाच फायदा; तडजोड नाही! माझे बंधू गणेश गीते २०१७ पासून भाजपचे सक्रिय पदाधिकारी आणि माजी स्थायी समिती सदस्य आहेत, तर ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. मी स्वतः भाजपच्या कुठल्याही पदावर नसलो, तरी माझ्या पडद्यामागच्या कामांमुळे अप्रत्यक्षपणे भाजपलाच फायदा झाला आहे. आजच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीतून काही सुवर्णमध्य निघेल असे वाटत नाही, कारण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असेही गीते यांनी स्पष्ट केले. या गौप्यस्फोटामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


