
इंदापूर/पुणे (pragatbharat.com) : जळगाव जिल्ह्यातील केळीच्या नुकसानीवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी आणि मंत्र्यांमधील वादाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकवासला धरणाच्या पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी घेऊन आलेल्या एका हताश शेतकऱ्याची राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थट्टा केल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, “तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस आहे,” असे म्हणत मंत्र्यांनी शेतकऱ्याला डावलल्याचे यात दिसत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मामा तुम्ही शब्द दिला होता! शेतकऱ्याच्या आठवणीवर मंत्र्यांचे थेट उत्तर मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आणि त्यामुळे शेतीचे नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याने मंत्री दत्तात्रय भरणे यांची त्यांच्या ‘भरणेवाडी’ येथील निवासस्थानी भेट घेण्याचा प्रयत्न केला. जळालेल्या उसाचे पंचनामे करून मदत मिळावी, अशी या शेतकऱ्याची आर्त हाक होती. मात्र, शेतकऱ्याची पूर्ण तक्रार ऐकून घेण्याऐवजी मंत्री भरणे थेट आपल्या चारचाकी वाहनात जाऊन बसले.
शेतकऱ्याने गाडीजवळ जात, ‘मामा तुम्ही आम्हाला शब्द दिला होता,’ अशी जुनी आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतप्त होत मंत्री भरणे यांनी, “मी कोणताही शब्द दिला नव्हता; ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही आंदोलन केले, आता त्यांनाच तुमच्या उसाचे पंचनामे करायला सांगा,” असे रोकडो उत्तर दिले. गाडीत बसताना त्यांनी “तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस” असे उपरोधिक वक्तव्य केल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात चर्चा हा व्हिडिओ नेमका कोणत्या दिवशीचा आहे, याबाबतची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र खडकवासला पाण्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरील हा व्हिडिओ सध्या फेसबुक, व्हॉट्सॲप आणि एक्स (X) वर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. अन्नदात्या शेतकऱ्याने आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी लोकप्रतिनिधीच्या दारात जाणे आणि तिथे कृषिमंत्र्यांनीच अशी पाठ फिरवणे, हा कार्यालयीन शिस्तीचा आणि नैतिकतेचा भंग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. जळगावपाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातही शेती आणि पाण्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


