
मुंबई (pragatbharat.com) : प्रत्येक माता-पित्यासाठी आपल्या बाळाचे पहिले पाऊल हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो, मात्र एका कुटुंबासाठी हाच क्षण काळजी वाढवणारा ठरला होता. केवळ ७ व्या महिन्यात जन्मलेली, अवघे १२५० ग्रॅम वजन असलेली आणि जन्मानंतर ३ महिने एनआयसीयूमध्ये (NICU) मृत्यूशी झुंज देणारी एक चिमुरडी जेव्हा १६ व्या महिन्यात चालायला लागली, तेव्हा ती सतत आपल्या पायांच्या बोटांवर (Toe Walking) चालत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. मात्र, आता मुंबईतील प्रसिद्ध ‘नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल’मधील (SRCC Children’s Hospital) तज्ज्ञ डॉक्टरांनी अवघ्या एका तासाच्या आधुनिक आणि विना-टाके (Minimally Invasive) प्रक्रियेद्वारे या ३ वर्षांच्या मुलीला पूर्णपणे बरे करून तिच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली आहे.
मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे उद्भवला होता आजार पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीत असे आढळले की, तिच्या पायाच्या स्नायूंमध्ये प्रचंड कडकपणा (Spasticity) होता. रुग्णालयात करण्यात आलेल्या मेंदूच्या एमआरआय (Brain MRI) चाचणीत ‘पेरिव्हेंट्रिक्युलर ल्युकोमॅलेशिया पॅचेस’ दिसून आले. याचा अर्थ जन्माच्या वेळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे पायाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागाला दुखापत झाली होती. वैद्यकीय भाषेत या आजाराला ‘स्पास्टिक डिप्लेजिक सेरेब्रल पाल्सी’ (Spastic Diplegic Cerebral Palsy) असे म्हणतात. या आजारामुळे मुलगी पावले जमिनीवर पूर्ण न टेकवता केवळ टाचा उंचावून बोटांवर चालत होती, ज्याला ‘इक्विनस गेट’ (Equinus Gait) म्हणतात.
अवघ्या एका तासात ‘बोटुलिनम टॉक्सिन’ आणि ‘युएसजी’ चमत्कार हॉस्पिटलचे बालरोग अस्थिरोग विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. तरल नागडा (Dr. Taral Nagda) यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने यावर एक अनोखी उपचार पद्धती आखली. केवळ फिजिओथेरपी पुरेशी नसल्याने, डॉक्टरांनी ‘बोटुलिनम टॉक्सिन’ (Botulinum Toxin) इंजेक्शन आणि ‘युएसजी-गाईडेड परक्युटेनियस मायोफेशिअल रिलीज’ (USG-guided percutaneous myofascial release) एकत्र करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीही मोठी चिरफाड किंवा टाके न घालता, अल्ट्रासाऊंडच्या मदतीने पायाच्या घट्ट झालेल्या स्नायूंना सैल करण्यात आले. केवळ एक तास चाललेल्या या प्रक्रियेत रक्तस्त्राव नगण्य होता आणि वेदनाही अत्यंत कमी होत्या.
शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी चिमुरडी पायांवर उभी या उपचाराचा परिणाम इतका तात्काळ आणि थक्क करणारा होता की, शस्त्रक्रिया संपताच चिमुरडीच्या पायाचा कडकपणा नाहीसा होऊन तिचे पाऊल योग्य स्थितीत आले. पायाची ही सुधारलेली स्थिती टिकवून ठेवण्यासाठी गुडघ्याखाली तात्पुरता प्लास्टर कास्ट लावण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर केवळ ३ दिवसांत तिला डिस्चार्ज देण्यात आला. सर्वात आनंदाची आणि भावूक गोष्ट म्हणजे, रुग्णालयातून घरी जाताच दुसऱ्याच दिवशी या ३ वर्षांच्या चिमुरडीने आधाराने स्वतःच्या पायावर पूर्ण पाऊल टेकवून चालण्यास सुरुवात केली.
या यशस्वी केसबद्दल माहिती देताना डॉ. तरल नागडा म्हणाले, “सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांमध्ये हाडांच्या वाढीच्या गतीने स्नायू वाढत नाहीत, ज्यामुळे पायांना कायमचे व्यंग येण्याचा धोका असतो. मुलाचा मेंदू या चुकीच्या चालण्याची सवय करून घेण्यापूर्वीच योग्य वयात अचूक हस्तक्षेप करणे गरजेचे असते. या चिमुरडीच्या बाबतीत आम्ही योग्य वेळी पाऊल उचलल्यामुळे तिला नैसर्गिक चाल तर मिळालीच, शिवाय तिचा आत्मविश्वासही कमालीचा वाढला आहे.”


