रोहित पवार आंदोलनावर ठाम! पोलिसांची नोटीस धुडकावून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू; शरद पवार गटातील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर?

पंढरपूर/सोलापूर (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या आणि विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘अन्नत्याग आंदोलना’वर बसले आहेत. स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली असून, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच रोहित पवार यांना कडक कायदेशीर नोटीस बजावली आहे. मात्र, पोलिसांची नोटीस धुडकावून रोहित पवार आपल्या आंदोलनावर ठाम राहिले आहेत.

वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचे कारण: पंढरपूर पोलिसांनी दिलेल्या नोटिशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे कारण दाखवले आहे. पालिकेने या आंदोलनासाठी शहरातील इतर मोकळ्या जागा सुचवल्या होत्या. मात्र, रोहित पवार यांनी त्याच चौकात आंदोलन सुरू केले. या आंदोलनावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, कारण सोलापूर जिल्ह्यात शरद पवार पक्षाचे चार आमदार आणि एक खासदार असतानाही, रोहित पवारांच्या या आंदोलनाचा निरोप स्थानिक नेत्यांपर्यंत पोहोचला नसल्याचे समोर आले आहे. आमदार उत्तम जानकर आणि आमदार अभिजीत पाटील या दोन प्रमुख आमदारांनी आपल्याला या आंदोलनाची कोणतीही माहिती नसल्याची जाहीर कबुली दिल्यामुळे पक्षात अंतर्गत विसंवाद असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

“सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर टिकणार नाही” – रोहित पवार पोलिसांच्या नोटिशीनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक आक्रमक पोस्ट शेअर करत सरकारवर घणाघाती टीका केली. त्यांनी लिहिले की, “विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आमच्या या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही.” सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर टिकत नसतो, असे म्हणत त्यांनी प्रशासनातील कर्मचारी मनाने आपल्याच सोबत असल्याचा दावाही केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *