सांगली हादरली! माथाडी नेत्याच्या घरात घुसून अंधाधुंद गोळीबार; १४ वर्षांच्या निष्पाप नातवाचा जागीच मृत्यू, शहरात प्रचंड खळबळ

सांगली (pragatbharat.com) : सांगली शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सांगलीच्या भरवस्तीत असलेल्या संजयनगर परिसरात एका स्थानिक माथाडी नेत्याच्या घरात ४ ते ५ अज्ञात मारेकऱ्यांनी बेधडक घुसून अंधाधुंद गोळीबार केला. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या थरारामध्ये माथाडी नेत्याच्या अवघ्या १४ वर्षांच्या निष्पाप नातवाला गोळ्या लागल्या असून, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेदांत बंडगर याचा उपचारापूर्वीच मृत्यू: मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील स्थानिक माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात संध्याकाळच्या वेळी अचानक ४ ते ५ सशस्त्र हल्लेखोर घुसले. मारेकऱ्यांनी सुरुवातीला दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर घरात अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या गोळीबारात बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत मारुती बंडगर (वय १४ वर्षे) हा गंभीररित्या जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वेदांतला कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासण्यापूर्वीच मृत घोषित केले. एका चिमुरड्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण सांगली शहर सुन्न झाले आहे.

व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज: घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकांसह पोलीस अधीक्षक तुषार जोशी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, तिथे नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या व्यावसायिक वादातून किंवा वैमनस्यातून झाला असण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संजयनगर परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हल्लेखोरांच्या शोधासाठी जिल्ह्यात नाकाबंदी: भरवस्तीत झालेल्या या गोळीबारानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलिसांनी संपूर्ण सांगली शहरात आणि जिल्ह्याच्या सीमांवर कडक नाकाबंदी लागू केली आहे. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांची विविध विशेष पथके रवाना करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *