शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? दिल्लीला रवाना होताना नाना पटोलेंचं अत्यंत सूचक वक्तव्य; भुजबळांवरही केली टीका

मुंबई/दिल्ली (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना आता प्रचंड वेग आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनीही यावर अत्यंत सूचक आणि मोठे विधान केले आहे. काँग्रेस हायकमांडच्या बोलावण्यावरून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना पटोले यांनी, देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनी काँग्रेससोबत एकत्र येण्याची प्रक्रिया देश पातळीवर सुरू झाल्याची कबुली दिली.

“पवार साहेबांनीच पहिला प्रस्ताव दिला होता” विलीनीकरणाच्या ऑफरबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले, “आम्ही कोणालाही थेट ऑफर दिलेली नाही. मात्र, स्वतः पवार साहेबांनीच यापूर्वी पहिला प्रस्ताव दिला होता, पण काही कारणांमुळे त्याला उशीर झाला. सध्या देशात संवैधानिक व्यवस्था धोक्यात आली असून देश विकला जात आहे. अशा वेळी केवळ तृणमूल काँग्रेस (TMC) किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचाच विषय नाही, तर भाजपच्या लोकशाहीविरोधी धोरणांविरुद्ध लढण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांची एकत्र येण्याची मानसिकता तयार होत आहे.” राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी या सर्व विषयावर सखोल मंथन करत असून देशहितासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री होण्याची संधी गमावली!” याच दरम्यान, ‘मला भूतकाळात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण शरद पवारांना सोडायचे नव्हते म्हणून मी गेलो नाही’, या छगन भुजबळ यांच्या विधानाचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. पटोले म्हणाले, “भुजबळ साहेबांना नक्की काय प्रस्ताव होता, हे मला ठाऊक नाही. मात्र, भुजबळ हे ओबीसींचे खूप मोठे नेते आहेत, त्यांच्यात ती क्षमता नक्कीच होती. त्यांनी ती मुख्यमंत्रीपदाची मोठी संधी गमावली, असेच मी म्हणेन.” भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हाच सध्या देशासमोरील एकमेव अजेंडा असून त्यासाठी सर्व विरोधी शक्तींना काँग्रेसच्या झेंड्याखाली मजबूत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *