अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक; ३ जुलैपासून प्रवासाला सुरुवात, दिल्लीत खलबते

नवी दिल्ली (pragatbharat.com) : आगामी पवित्र श्री अमरनाथ जी यात्रेच्या (Shri Amarnath Ji Yatra 2026) पूर्वतयारीचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील परिस्थिती आणि यात्रेकरूंची सुरक्षा लक्षात घेता, गृहमंत्रालयाने या बैठकीत सुरक्षा यंत्रणांना चोख बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च अधिकारी बैठकीला उपस्थित:

नवी दिल्लीत झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) चे महासंचालक (DGs) उपस्थित होते. या बैठकीत सुरक्षा दलांची तैनाती, गुप्तचर यंत्रणांचा समन्वय, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि यात्रेकरूंच्या आरोग्य-वाहतूक सुविधांवर सविस्तर चर्चा झाली.

३ जुलैपासून यात्रेला होणार सुरुवात:

वर्ष २०२६ ची अमरनाथ यात्रा आगामी ३ जुलैपासून अधिकृतपणे सुरू होणार असून २८ ऑगस्ट २०२६ रोजी (रक्षाबंधनाच्या दिवशी) ती समाप्त होईल. तब्बल ५७ दिवस चालणारी ही यात्रा पारंपारिक पहलगाम आणि बालटाल अशा दोन्ही मार्गांवरून एकाच वेळी सुरू होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव १ जुलैपासूनच अमरनाथ यात्रेचे सर्व मार्ग ‘नो फ्लाईंग झोन’ (No Flying Zone) म्हणून घोषित करण्यात आले असून या काळात हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध नसणार आहे, त्यामुळे भाविकांना पायी किंवा घोडे-पालखीच्या साहाय्यानेच प्रवास करावा लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *