
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक आणि मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडल्याची चर्चा असून, पक्षाच्या एकूण ९ खासदारांपैकी ६ खासदार फुटल्याची माहिती समोर येत आहे. हे खासदार लवकरच आपला वेगळा गट तयार करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या मोठ्या राजकीय भूकंपामुळे ठाकरे गटाकडून सातत्याने भारतीय जनता पक्षावर (भाजप) टीका केली जात असून, या सर्व फोडाफोडीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. आता या सर्व आरोपांना भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुरलीधर मोहळ यांचा ‘तो’ वक्तव्याने राजकीय बॉम्ब ठाकरे गटाच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी एक मोठे विधान केले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मोहळ म्हणाले की, “शिवसेना आणि ‘ऑपरेशन टायगर’ यामध्ये भाजपचा काय संबंध आला? भाजपच्या माणसाला त्याबद्दल कशाला विचारता? दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्वजण भाजपला साथ देत आहेत आणि साथ देणारे कोणी येत असतील तर त्यांचे स्वागत आहे.”
पुढे बोलताना त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजपचे मागेपुढे काही नसते, जे आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्यांची २०२४ ची निवडणूक ही शेवटची होती, मग त्यांनी २०२९ च्या निवडणुकीचे भविष्य का बघावे?” मोहळ यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
ठाकरे गटात घडामोडींना वेग, ‘व्हिप’ जारी ६ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याच्या वृत्तामुळे ठाकरे गटात तातडीच्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उद्या ठाकरे गटाकडून खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सर्व खासदारांनी उपस्थित राहावे, यासाठी पक्षाकडून ‘व्हिप’ (Whip) देखील जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील पाणी कपातीवरही मोहळ यांनी दिली प्रतिक्रिया दरम्यान, पुण्यात सुरू असलेल्या पाणी कपातीच्या निर्णयावरही खासदार मुरलीधर मोहळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “पुणे महानगरपालिकेतील आमचे लोक आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. एकूण आजची परिस्थिती पाहता पावसाने ओढ दिली आहे आणि धरण साखळीमध्ये पाणी कमी आहे. त्यामुळेच प्रशासनाने पाणी कपातीचा हा निर्णय घेतला असावा.”



