मुंबईत मोठी कारवाई: गोवंडी येथील चिल्ड्रन्स हॉस्पिटलवर FDA चा छापा, ९ लाख रुपयांचा औषध साठा जप्त | Mumbai Govandi Children Hospital FDA Raid Medicines Seized

मुंबई (pragatbharat.com) :

मुंबईत रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील गोवंडी परिसरातील एका लहान मुलांच्या रुग्णालयावर (Paediatric Hospital) मोठी कारवाई केली आहे. वैध ड्रग्ज लायसन्स (औषध परवाना) नसताना आणि कोणत्याही तांत्रिक पात्रतेविना बेकायदेशीरपणे औषध विक्री केल्याप्रकरणी एफडीएने या रुग्णालयातून तब्बल ९ लाख ९ हजार २१५ रुपयांचा ॲलोपॅथिक औषध साठा जप्त केला आहे.

१२ वी पास रिसेप्शनिस्ट विकत होती औषधे: विशेष अंमलबजावणी मोहिमेअंतर्गत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गोवंडी पूर्व येथील शिवाजीनगर भागात असलेल्या या बाल रुग्णालयाची गुरुवारी अचानक तपासणी केली. या तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना आढळले की, रुग्णालयाच्या संचालकाने दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲलोपॅथिक औषधांचा साठा करून ठेवला होता. धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरील ही अत्यंत महत्त्वाची औषधे रुग्णालयातील एका १२ वी पास रिसेप्शनिस्ट महिलेमार्फत थेट रुग्णांना विकली जात होती. फार्मसी कायद्यांतर्गत (Pharmacy Act) औषधांचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैधानिक किंवा तांत्रिक पात्रता या महिलेकडे नव्हती.

बिल बुकावर महत्त्वाच्या नोंदी गायब: कारवाई दरम्यान एफडीए अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे सेल्स बिल बुक देखील जप्त केले आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या बिलांवरून अनेक कायदेशीर आणि वैधानिक तपशील गायब असल्याचे तपासात समोर आले. बिलावर केवळ रुग्णाचे नाव, तारीख, औषधाचे नाव आणि आकारलेली रक्कम एवढीच माहिती होती. नियमानुसार आवश्यक असलेला बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग तारीख, एक्सपायरी डेट (अंतिम तारीख) आणि उत्पादक कंपनीचे नाव यांपैकी कोणतीही माहिती बिलावर लिहिलेली नव्हती.

तुकराम मुंढे यांचा कडक इशारा: या मोठ्या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकराम मुंढे यांनी कडक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, “रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड करणारी कोणतीही गोष्ट अन्न व औषध प्रशासन खपवून घेणार नाही. वैध परवान्याशिवाय औषध विक्री करणाऱ्यांवर, अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत औषध वितरण करणाऱ्यांवर आणि कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी नेहमी परवानाधारक फार्मसीमधूनच औषधे खरेदी करावीत आणि प्रत्येक खरेदीच्या वेळी सर्व कायदेशीर तपशील असलेले योग्य बिल आवर्जून घ्यावे.”

या प्रकरणी आता ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, १९४० (Drugs and Cosmetics Act) अंतर्गत रुग्णालयाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *