
मुंबई / धाराशिव (pragatbharat.com) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या संभाव्य बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ६ खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज केल्याची चर्चा असतानाच, सर्वांचे लक्ष धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्यांअभावी कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याने ओमराजे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. दरम्यान, या संपूर्ण वादावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे.
ओमराजेंनी अद्याप पक्ष सोडलेला नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण : माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना सोडली किंवा सोडत असल्याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. वडिलांच्या कोर्टाच्या खटल्यात व्यस्त असल्यामुळे ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत आणि प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत. ‘मी अद्याप शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, तर माझ्याविषयी अशा अफवा का पसरवल्या जात आहेत?’ असे स्वतः ओमराजेंनी सांगितले आहे. त्यामुळे संभ्रमात असलेल्या किंवा संपर्कात असलेल्या खासदारांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत.”
‘२०० ते ५०० कोटींच्या निधीच्या मोहात खासदार अडकले’ : संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर टीका करताना सांगितले की, विरोधी पक्षात राहून संघर्ष करण्याची भाषा करणारे निवडून आल्यावर सत्तेच्या उबेसाठी लाचार होतात. खासदारांना २०० कोटी ते ५०० कोटी रुपयांच्या निधीची आमिषे दाखवली जात आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे सर्व खासदार अजूनही शिवसेनेतच आहेत. मतदारसंघात जायला त्यांना जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे.
२७ ते २९ जून दरम्यान उद्धव ठाकरेंचा झंझावाती दौरा : पक्षातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत. आज ते ईशान्य मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून, त्यानंतर २७ ते २९ जून २०२६ दरम्यान ते बंडखोर खासदारांच्या सर्व मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. नागपूर आणि यवतमाळपासून सुरू होणारा हा दौरा शिर्डी येथे संपेल. या दौऱ्यात धाराशिव, हिंगोली आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश असून, उद्धव ठाकरे तेथे जनतेशी थेट संवाद साधणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.


