
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या संभाव्य फुटीमुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असे दिसत असतानाच, खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. “बंडखोर खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेतच असून ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी आधी चर्चा केली जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
‘खासदार अजूनही आमच्या संपर्कात, व्हीपबाबत कारवाई सुरू’ : माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून अद्याप कोणत्याही स्वतंत्र गटाला अधिकृत निर्देश मिळालेले नाहीत. तसेच आम्ही शिवसेना सोडली आहे, असे कोणत्याही खासदाराने जाहीरपणे सांगितलेले नाही. ते केवळ पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करून बैठकीला गैरहजर राहिले, ज्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मतदारसंघात जाताना जनतेच्या रोषाची भीती वाटत असल्याने अनेक खासदार संभ्रमात आहेत आणि ते म्हणतात आम्ही शिवसेनेतच आहोत. अशा खासदारांशी चर्चा करणे स्वाभाविक आहे आणि ज्या क्षणी ते पक्ष सोडतील, तेव्हा त्यांच्याशी संबंध तोडले जातील.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पुन्हा घणाघात : संजय राऊत यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर व्यापारी असल्याची टीका करत गंभीर आरोप केले. “शेअर बाजारात पैसे गुंतवणे आणि कृत्रिम भाव वाढवणे हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. त्यांनी देशात प्रादेशिक पक्ष आणि खासदार फोडून भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याचे षडयंत्र रचले आहे. एकनाथ शिंदे ही अमित शाहांची ‘टेस्ट ट्यूब बेबी’ असून त्यांच्या दबावामुळेच निवडणूक आयोगाने शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिले. अमित शाहांच्या नावाने जे राजकारण करत आहेत, ते मराठी मातीशी गद्दारी करत आहेत,” असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे २७ ते २९ जून दरम्यान या सर्व खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.


