
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्रातील आणि देशातील खासदारांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग आहेत,” असा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच, भविष्यात अमित शाह हे स्वतः पंतप्रधान होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड करू शकतात, असाही गौप्यस्फोट त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
‘अमित शाह देशात अराजक निर्माण करत आहेत’ : संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका करताना म्हटले की, “शिवसेनेसह तृणमूल काँग्रेस (TMC) मधील खासदार फुटीला अमित शाह हेच जबाबदार आहेत. शाह हे मूळचे व्यापारी असून देशात राजकीय अराजक निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. प्रादेशिक पक्ष आणि खासदार फोडून भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याचे हे मोठे कारस्थान असून, या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी एकनाथ शिंदेंना सामील करून घेतले आहे. या बंडखोर खासदारांच्या बळावर शाह कधीही मोदींविरोधात उभे राहू शकतात.”
‘एकनाथ शिंदे ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी’ : पुढे बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्रमक शब्दांत निशाणा साधला. “एकनाथ शिंदे हे अमित शाहांची ‘टेस्ट ट्यूब बेबी’ आहेत. त्यांच्या दबावामुळेच सर्वोच्च न्यायालय गेल्या चार वर्षांत अपात्रतेचा निर्णय देऊ शकले नाही आणि निवडणूक आयोगानेही त्यांना शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह दिले. अमित शाह यांनी शिंदेंना शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची चुकीची प्रेरणा दिली असून, त्यांच्या पोटातील विष आता ओठावर आले आहे. परंतु, मोदींनंतर भाजपचा कोणीच पंतप्रधान होणार नाही आणि आमचीच शिवसेना ही खरी असली शिवसेना आहे,” असे आव्हान राऊत यांनी दिले.


