Koffee With Karan: ‘कल हो ना हो’ चित्रपटासाठी करीना कपूर होती पहिली पसंती; प्रीती झिंटाने दिले होते सडेतोड उत्तर, म्हणाली – ‘ते जीन्ससारखे…’

मुंबई (pragatbharat.com) : बॉलीवूडमधील मैलाचा दगड ठरलेल्या ‘कल हो ना हो’ (Kal Ho Naa Ho) या चित्रपटातील ‘नैना’ची भूमिका प्रेक्षकांच्या आजही चांगलीच लक्षात आहे. मात्र, या भूमिकेसाठी अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) ही पहिली पसंती नव्हती, तर तिच्याआधी करीना कपूरला (Kareena Kapoor) ही ऑफर देण्यात आली होती. ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या टॉक शोमध्ये जेव्हा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने प्रीतीला दुसरी पसंती असण्याबाबत विचारले, तेव्हा तिने अत्यंत मार्मिक आणि सडेतोड उत्तर देऊन सर्वांची मने जिंकली होती.

‘दुसऱ्याने जीन्स ट्रायल केली म्हणजे त्यांची होत नाही’ – प्रीती झिंटा : करण जोहरने शो दरम्यान प्रीतीला विचारले होते की, “या चित्रपटासाठी करीना पहिली पसंती होती, मग तिच्या जागी काम करताना तुला नेमके कसे वाटले?” यावर उत्तर देताना प्रीती म्हणाली, “हा चित्रपट माझ्या नशिबातच लिहिलेला होता. जर तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि तिथे एका रॅकवर असलेली जीन्स एखाद्याने ट्रायल करून पाहिली, पण ती विकत घेतली नाही; तर याचा अर्थ असा होत नाही की ती जीन्स त्याची झाली. त्यानंतर जो दुसरा व्यक्ती येतो, ती जीन्स घालतो आणि विकत घेतो, ती त्याची होते. हे देखील तसेच आहे.”

कथेचे कौतुक आणि चित्रपटाची स्टारकास्ट : प्रीतीने पुढे सांगितले की, “जेव्हा करणने मला फोन केला आणि मी या चित्रपटाची कथा (Script) ऐकली, तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला की करीनाने या चित्रपटाला नकार का दिला असेल? पण जे झाले ते चांगलेच झाले.” निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि यश जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन्सने निर्मिती केलेल्या या चित्रपटात शाहरूख खान (अमन), सैफ अली खान (रोहित) आणि प्रीती झिंटा (नैना) यांच्या मुख्य भूमिका होत्या. न्यूयॉर्क शहराच्या पार्श्वभूमीवर आधारलेली ही प्रेमकथा आजही बॉलीवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *