IIM Nagpur Pimpri Chinchwad Campus: पिंपरी-चिंचवडमध्ये आयआयएम (IIM) शाखेला मोठा बुस्टर; कॅबिनेट बैठकीत मोशी येथील जागा निशुल्क देण्यास मंजुरी!

पिंपरी-चिंचवड (pragatbharat.com) : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्था असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (IIM) ची विस्तारित शाखा उभारणीला आता मोठा ‘बुस्टर’ मिळाला आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या जागतिक दर्जाच्या संस्थेसाठी मोशी येथील शासकीय जागा पूर्णपणे निशुल्क (मोफत) देण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण मागणीला आणि पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे.

आयआयएम नागपूरची विस्तारित शाखा मोशीत होणार साकार ‘आयआयएम नागपूर’ (IIM Nagpur) या नामांकित संस्थेचा विस्तार पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे व्हावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने वज्रमुठ आवळली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभाग यांनी या जागेसाठी आधीच सकारात्मकता दर्शवली होती. आता राज्य सरकारच्या कॅबिनेटच्या अंतिम मंजुरीच्या शिक्कामोर्तबमुळे या भव्य शैक्षणिक प्रकल्पाचा कायदेशीर मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

औद्योगिक आणि आयटी हबचा फायदा; कनेक्टिव्हिटी ठरणार गेमचेंजर पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई ही मोठी शहरे परस्परांच्या जवळ असल्याने, तसेच पिंपरी-चिंचवडमधील आशियातील सर्वात मोठा विशाल औद्योगिक पट्टा आणि हिंजवडी-तळवडे येथील आयटी हबचा विचार करता, विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल शिक्षणासाठी आणि ‘कनेक्टिव्हिटी’च्या दृष्टीने मोशी येथील जागेची निवड अत्यंत अचूक मानली जात आहे. या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणात ‘आयआयएम’ सारखी राष्ट्रीय स्तरावरील मॅनेजमेंट संस्था शहरात येणे हे पिंपरी-चिंचवडच्या वैभवात आणि शैक्षणिक दर्जात भर घालणारे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड ‘एज्युकेशन हब’ बनणार – आमदार महेश लांडगे या ऐतिहासिक मंजुरीनंतर आनंद व्यक्त करताना आमदार महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडला देशातील अग्रगण्य ‘एज्युकेशन हब’ (Education Hub) बनवणे हा आमचा मुख्य संकल्प आहे आणि ‘आयआयएम’ च्या रूपाने या संकल्पाला आज सर्वात मोठे बळ मिळाले आहे. आपल्या शहरात ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था सुरू व्हावी, यासाठी मुख्यमंत्री यांनी सुरुवातीपासूनच आम्हास सकारात्मक पाठबळ दिले आणि कॅबिनेट बैठकीत निशुल्क जागा मंजूर करून या स्वप्नाला गती दिली आहे. उद्योग, आयटी आणि उच्च शिक्षण यांचा हा त्रिवेणी संगम शहराच्या उज्ज्वल भविष्याची मजबूत पायाभरणी ठरेल!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *