
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात अंतर्गत वाद आता थेट चव्हाट्यावर आला असून वाद कमालीचा विकोपाला गेला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी थेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर एक अत्यंत आक्रमक पोस्ट शेअर करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच एक मोठी मागणी केली आहे. ६ खासदारांच्या बंडखोरीच्या धक्क्यातून सावरत असतानाच, आता पक्षात नेत्यांमधील अंतर्गत शीतयुद्ध उघड झाल्याने ठाकरे गटाची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे.
भास्कर जाधवांच्या त्या विधानाचा थेट व्हिडीओ केला शेअर! काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी माध्यमांशी बोलताना आमदार भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात वाहनाचा हॉर्न वाजवण्यावरून वाद झाला होता. त्या वादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भास्कर जाधव अत्यंत रागात “नार्वेकर कोण लागून गेला…” असे वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. यावर जाहीर नाराजी आणि संताप व्यक्त करत मिलिंद नार्वेकर यांनी तोच व्हिडिओ आपल्या अधिकृत खात्यावरून पोस्ट केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मागणी मिलिंद नार्वेकर यांनी ही पोस्ट शेअर करताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत विनंती केली आहे. “भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी दिलेल्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा,” अशी मागणी नार्वेकरांनी केली आहे. पुढे आपली उद्विग्नता व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, “अंमलबजावणी होत नसल्याने जो मानसिक त्रास होत आहे, त्याचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे.” नार्वेकरांच्या या थेट पोस्टमुळे ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी आणि धुसफूस आता अधिकृतपणे चव्हाट्यावर आली आहे.
‘ऑपरेशन टायगर’नंतर ठाकरेंच्या शिवसेनेला दुहेरी फटका शिवसेना शिंदे गटाने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाचे ६ खासदार आधीच बंडखोरीच्या मार्गावर आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकतीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. अशातच आता दिल्लीत फूट आणि मुंबईत नेत्यांमधील अंतर्गत कलह यामुळे ठाकरे गटाचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मिलिंद नार्वेकर यांच्या या रोखठोक पवित्र्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या अंतर्गत वादावर काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


