
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. बहुप्रतीक्षित विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये सत्ताधारी महायुतीने बहुतांश जागांवर दणदणीत विजय मिळवत आपला बोलबाला कायम ठेवला आहे. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) नाशिकमध्ये अत्यंत मोठा आणि धक्कादायक झटका बसला आहे. नाशिकमधून भाजपच्या अधिकृत गणितांना सुरुंग लावत अपक्ष बंडखोर उमेदवार गोकुळ गित्ते यांनी अनपेक्षित विजय मिळवला आहे. राज्यातील सर्व ११ जागांचे कल आणि निकाल समोर आले असून काही ठिकाणी महायुतीला प्रचंड यश आले आहे, तर काही जागांवर महाविकास आघाडीला (MVA) पराभवाचे धक्के सहन करावे लागले आहेत.
नाशिकमध्ये भाजपची रणनीती फेल; बंडखोर गोकुळ गित्ते विजयी या संपूर्ण निवडणुकीत नाशिकचा निकाल सर्वात धक्कादायक आणि भाजपची चिंता वाढवणारा ठरला आहे. भाजपचे संकटमोचक गिरीष महाजन आणि उदय सावंत यांनी गोकुळ गित्ते यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला होता, असा राजकीय सूर होता. मात्र, सर्व दबावा झुगारून गित्ते अपक्ष म्हणून मैदानात ठाम राहिले. विशेष म्हणजे, त्यांनी कोणताही मोठा जाहीर प्रचार केला नसतानाही स्थानिक पातळीवरील छुप्या पाठिंब्यामुळे ते थेट निवडून आले. या ऐतिहासिक विजयानंतर प्रतिक्रिया देताना गोकुळ गित्ते यांनी “अखेर सत्याचा विजय झाला,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत महायुतीचा गुलाल नाशिकचा अपवाद वगळता इतर सर्वच ठिकाणी महायुतीने विरोधकांना चारी मुंड्या चीत केले आहे:
- जळगाव आणि नागपूर: जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी तब्बल ५७७ मतांनी दणदणीत विजय मिळवला असून त्यांच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. तसेच नागपूरमध्येही भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.
- भंडारा-गोंदिया: येथे भाजपचे अविनाश ब्राह्मणकर ३०४ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर (१५२ मते) यांचा १४८ मतांनी पराभव केला.
- छत्रपती संभाजीनगर-जालना: भाजपचे सुहास शिरसाठ ४५४ मते मिळवून विजयी झाले, तर ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांना अवघी १३४ मते मिळाली. येथे मविआचे शरद तायडे यांनी पुन्हा एकदा ‘मॅजिक पेन’चा उल्लेख करत निवडणूक प्रक्रियेवर आणि महायुतीच्या धनशक्तीवर संशय व्यक्त केला आहे.
- नांदेड: महायुतीचे अमरनाथ राजूरकर ३३९ मते मिळवून २५५ मतांच्या अवाढव्य मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी मविआचे कृष्णा पाटील आष्टीकर (८४ मते) आणि वंचितचे प्रशांत इंगोले (५ मते) यांचा धुव्वा उडवला.
पश्चिम महाराष्ट्र आणि धाराशिवमध्येही विरोधकांना धक्का
- सांगली-सातारा: भाजपच्या धैर्यशील कदम यांना ५९१ पहिल्या पसंतीची मते मिळाली असून, ४४३ मतांचा कोटा पार करत त्यांनी आपला विजय निश्चित केला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप (२९५ मते) यांचा पराभव केला.
- धाराशिव: येथे भाजपचे बसवराज पाटील ८४५ मते मिळवून प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत.
- राजेंद्र राऊत आघाडीवर: दुसऱ्या एका जागेवर भाजपचे राजेंद्र राऊत १०७ मते घेऊन प्रचंड आघाडीवर आहेत, तर शरद पवार गटाच्या वसंत देशमुख यांना अवघी २७ मते मिळाली आहेत.
या निकालांमुळे विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ कमालीचे वाढले असून विरोधकांना अंतर्गत फुटीचा आणि रणनीतीचा मोठा फटका बसल्याचे स्पष्ट दिसत आहे.


