- पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन जागे कधी होणार?..शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांचा सवाल…
पिंपरी चिंचवड (दि. १३ ऑगस्ट २०२६ pragatbharat.com) :- पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेल्याचा दावा करत शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे. मागील पाच वर्षांत केवळ ४३ हजार ६४४ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले असून, मागील चार महिन्यांत १३ हजार ६१५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

चिखलीतील म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षीय मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात केवळ १० टक्के पाळीव, तर तब्बल ९० टक्के कुत्री मोकाट असल्याचे बारणे यांनी सांगितले.
महापालिकेने प्रभावी नसबंदी मोहीम राबविण्यासाठी पुरेशी केंद्रे सुरू करावीत. तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण वाढवून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते व नागरिकांकडून उघड्यावर शिळे अन्न टाकले जात असल्याने कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारे अन्न टाकणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी बारणे यांनी केली.

