Arjun Tendulkar T20 Mumbai League 2026: आयपीएलमध्ये बेंचवर बसलेल्या अर्जुन तेंडुलकरचा धमाका; टी-२० मुंबई लीगमध्ये ‘विराट’ स्टाईलने सिक्स मारून सामना जिंकवला, श्रेयस अय्यरच्या टीमला फटका

मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) ताफ्यात असूनही बेंचवरच राहावे लागलेल्या अर्जुन तेंडुलकरने मैदानात उतरताच आपली क्षमता सिद्ध केली आहे. ‘टी-२० मुंबई लीग’च्या पहिल्याच सामन्यात अर्जुनने चेंडू आणि बॅटने मोलाचे योगदान देत अंधेरी टीमला शानदार विजय मिळवून दिला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अर्जुनने थेट विराट कोहलीच्या स्टाईलमध्ये खणखणीत विजयी षटकार (Winning Six) ठोकून सामना संपवला, ज्याची सध्या क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

अंधेरी विरुद्ध सोबो फालकन्स सामना: या सामन्यात अर्जुन तेंडुलकर शिवम दुबेच्या नेतृत्वाखालील ‘अंधेरी’ टीमकडून खेळत होता. त्यांच्यासमोर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील ‘सोबो फालकन्स’चे आव्हान होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना सोबो फालकन्सची टीम केवळ १२६ धावांवर ऑलआऊट झाली. अंधेरीच्या वतीने कॅप्टन शिवम दुबे आणि अजय मिश्रा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत फालकन्सचे कंबरडे मोडले. फालकन्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर अवघ्या ५ धावांवर बाद झाला, तर आदित्य तरेच्या ५९ धावांच्या खेळीमुळे टीमला १२६ धावांपर्यंत पोहोचता आले. अर्जुन तेंडुलकरने अचूक गोलंदाजी करत ३ ओव्हर्समध्ये २१ धावा देत १ महत्त्वाचा बळी घेतला.

विराट कोहलीच्या अंदाजात मॅच फिनिश: १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अंधेरीचा ओपनर दिव्यांश सक्सेना याने ५० धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. १४ व्या ओव्हरमध्ये ११९ धावांवर ५ वी विकेट गेल्यानंतर अर्जुन तेंडुलकर क्रीजवर आला. विजयासाठी फार धावांची गरज नसताना, ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक मिळताच अर्जुनने कडक सिक्स मारून आयपीएल फायनलच्या अंदाजात मॅच फिनिश केली. अंधेरीने हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. आयपीएलमध्ये संधीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागलेल्या अर्जुनने मुंबई लीगच्या पहिल्याच मॅचमध्ये घेतलेल्या या झेपमुळे चाहत्यांकडून त्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *