FIH Nations Cup: भारतीय महिला हॉकी संघाची विजयी घोडदौड! उरुग्वेचा ३-२ ने पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश

ऑकलंड (pragatbharat.com) : न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे सुरू असलेल्या ‘एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२६’ (FIH Hockey Women’s Nations Cup) स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने आपली अविरत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम गट सामन्यात भारताने उरुग्वेचा ३-२ असा पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत (Semifinals) जागा पक्की केली आहे. भारताच्या या शानदार विजयात स्टार फॉरवर्ड खेळाडू दीपिका हिने दोन गोल करत आणि दीपिका सोरेंग हिने एक गोल करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या अटीतटीच्या विजयासह भारतीय संघाने पूल ‘ए’ (Pool A) मध्ये सलग तीन सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने यापूर्वी अमेरिका आणि जपानचा पराभव केला होता. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला उरुग्वेच्या कियारा अपेनिनाने पेनाल्टी कॉर्नरद्वारे गोल करत भारतावर १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, भारताने जोरदार पुनरागमन केले. सामन्याच्या २४ व्या मिनिटाला दीपिकाने पेनाल्टी कॉर्नरचा अचूक फायदा उठवत गोल केला आणि पूर्वार्धात सामना १-१ अशा बरोबरीत आणला.

उत्तरार्धातील थरार आणि दीपिकाचा विजयी गोल : उत्तरार्धात भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला दीपिका सोरेंगने सुरेख मैदानी गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ५५ व्या मिनिटाला उरुग्वेचा कर्णधार मॅन्युएलाने गोल करत सामना २-२ अशा रंजक वळणावर आणला. उरुग्वेचा हा आनंद फार काळ टिकला नाही; अवघ्या ६० सेकंदांच्या आत म्हणजेच ५६ व्या मिनिटाला भारताच्या दीपिकाने आपला दुसरा गोल डागत भारताला ३-२ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. संपूर्ण सामन्यात भारताने तब्बल ७ पेनाल्टी कॉर्नर मिळवत उरुग्वेवर दबाव कायम ठेवला. अपराजित राहिलेला भारतीय संघ आता २० जून रोजी दक्षिण कोरिया किंवा चिलीविरुद्ध उपांत्य फेरीत दोन हात करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *