Lag Ja Gale Song History: ६२ वर्षांपूर्वी ‘या’ सुपरहिट गाण्याची धून दिग्दर्शकाने नाकारली होती; सत्य समजल्यावर स्वतःच्याच डोक्यावर चप्पल मारायला झाले तयार!

पुणे (pragatbharat.com) : हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही गाणी अशी असतात, जी काळाच्या मर्यादा ओलांडून अजरामर होतात. असंय एक गाणं म्हणजे ‘लग जा गले’ (Lag Ja Gale). आज तब्बल ६२ वर्षांनंतरही हे गाणे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजात आणि संगीतकार मदन मोहन यांच्या सुरेल संगीताने सजलेले हे गीत १९६४ मधील ‘वो कौन थी?’ या चित्रपटातील आहे. मात्र, या गाण्याच्या निर्मितीचा एक अतिशय रंजक आणि थक्क करणारा किस्सा नुकताच समोर आला आहे.

दिग्दर्शक राज खोसला यांनी सुरुवातीला दिला होता नकार: आश्चर्याची बाब म्हणजे, ‘वो कौन थी?’ या चित्रपटाचे दिग्गज दिग्दर्शक राज खोसला यांना सुरुवातीला या गाण्याची धून अजिबात आवडली नव्हती. मदन मोहन यांनी जेव्हा ही धून पहिल्यांदा तयार करून राज खोसला यांना ऐकवली, तेव्हा त्यांना ती अपेक्षेप्रमाणे प्रभावी वाटली नाही. त्यामुळे त्यांनी या गाण्याला थेट नकार दिला होता, ज्यामुळे मदन मोहनही काहीसे नाराज झाले होते.

“माझा बूट कुठे आहे?” – दिग्दर्शकाला झाला पश्चात्ताप: यानंतर चित्रपटाचे मुख्य अभिनेता मनोज कुमार यांच्या मध्यस्थीने एक बैठक बोलावण्यात आली. मनोज कुमार यांच्या आग्रहावरून मदन मोहन यांनी तीच धून पुन्हा एकदा पूर्ण भावनेने आणि वाद्यांच्या साथीने ऐकवली. यावेळी गाण्याचे शब्द आणि संगीत ऐकताच राज खोसला मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि आपल्या हातून किती मोठी चूक होत होती, याची त्यांना जाणीव झाली.

धून संपताच राज खोसला यांनी स्वतःवरच नाराजी व्यक्त करत विनोदी शैलीत, ‘मेरा जूता कहां है?’ (माझा बूट कुठे आहे?) असा प्रश्न विचारला. इतक्या अप्रतिम आणि जादुई धूनला पहिल्यांदा नाकारल्याबद्दल त्यांना प्रचंड पश्चात्ताप झाला होता आणि स्वतःच्याच डोक्यावर मारून घेण्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.

सहा दशकांनंतरही जादू कायम: पुढील काळात राज खोसला यांनी हे गाणे चित्रपटात समाविष्ट केले आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘लग जा गले’ हे गाणे केवळ त्या चित्रपटाचीच नाही, तर भारतीय संगीतविश्वाची ओळख बनले. आज सहा दशकांचा काळ उलटून गेल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता आणि जादू तसूभरही कमी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *