
नवी दिल्ली (pragatbharat.com) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष सोहळ्यात १५ परिचारिका आणि परिचर्या व्यावसायिकांना प्रतिष्ठित ‘नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आले. आरोग्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल या ‘आरोग्य योद्ध्यांना’ हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे.
हे पुरस्कार केंद्र आणि राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या नोंदणीकृत परिचारिका, सुईणी (Midwives) आणि महिला आरोग्य अभ्यागतांना दिले जातात. प्रत्येक पुरस्कारात गुणवत्ता प्रमाणपत्र, १ लाख रुपये रोख आणि पदक यांचा समावेश आहे. या सोहळ्याला केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
परिचारिकांनी समाजासाठी दिलेल्या गुणवंत आणि मोलाच्या सेवेची दखल घेण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने १९७३ मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. रुग्णांची सेवा करताना दाखवलेले समर्पण आणि निष्ठेचे प्रतीक म्हणून हा पुरस्कार मानला जातो.

