Pune Illegal Abortion Female Foeticide Racket Busted Daund Kedgaon | पुण्यात गर्भलिंग चाचणी आणि गर्भपाताच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड; बोगस डॉक्टरसह साथीदारांना अटक, ५०० गर्भपाताचा संशय

पुणे (pragatbharat.com) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत यवत पोलिसांनी घरामध्ये गुप्तपणे बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करणाऱ्या एका बोगस डॉक्टरसह त्याच्या काही साथीदारांना अटक केली आहे. हा बोगस डॉक्टर कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून थेट गरोदर महिलांच्या घरी जाऊन गर्भलिंग निदान करायचा आणि त्यानंतर बेकायदेशीररित्या गर्भपात घडवून आणायचा, अशी धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

या प्रकरणाची पाळेमुळे अत्यंत खोलवर रुजलेली असून, एका गर्भलिंग निदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दौंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गुजर यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान त्याने ही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन नरेंद्र ठाकरे नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याचे कबूल केले असून, पोलिसांनी ती मशीन जप्त केली आहे. या बेकायदेशीर कृत्यासाठी संबंधितांकडून ३५ ते ५० हजार रुपये आकारले जात होते.

पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भलिंग निदान केल्यानंतर मुलीचा गर्भ असल्यास हा बोगस डॉक्टर संबंधित महिलांना काही ठराविक डॉक्टरांकडे गर्भपातासाठी पाठवायचा. या साखळीत डॉ. अतुल जाधव याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे, तर इतर दोन संशयित डॉक्टर सध्या फरार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, गेल्या दोन वर्षांत या रॅकेटद्वारे सुमारे ५०० बेकायदेशीर गर्भपात केले गेल्याची भीती रेकॉर्डवरून व्यक्त होत आहे. संबंधित महिला आणि त्यांचे नातेवाईक ही माहिती गुप्त ठेवत असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या गुन्ह्या संदर्भात काहीही माहिती असल्यास त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन किंवा दौंड उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *